नेवासा – निर्सगाचे संतुलन आणि पर्यावरण संवर्धनासाठी जल,जंगल,जमीनी,जन आणि जनावर या पंचसूत्रीची जपवणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जल व पर्यावरण मित्र सुखदेव फुलारी यांनी केले. भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्र व कला महाविद्यालयाच्या वतीने नेवासा तालुक्यातील टोका (प्रवरासंगम) येथील सिद्धेश्वर मंदिर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकाकरीता आयोजित ‘मूल्य शिक्षण कार्यशाळेत’ अंतर्गत “पर्यावरण संवर्धन व गोदावरी नदी स्वच्छता”
या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.फुलारी बोलत होते. शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ.नारायणराव म्हस्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रा.विकास कसबे,राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक प्रा.डॉ. संजय महेर,कार्यक्रम अधिकारी डॉ.मोहिनी साठे, प्रा.योगेश लबडे, प्रा.वैभव लाटे,रमेश भालेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री.फुलारी पुढे म्हणाले की, गोदावरी नदीचा उगम नाशिक मधून होऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. तिला दक्षिण गंगा म्हणून संबोधले जाते. नदी ही केवळ पाणी वहन करणारी व्यवस्था नसून ती एक परिसंस्था आहे. प्रत्येक एक किलोमीटरवर जैवविविधता
आणि पाण्याचे गुणधर्म बदलत असते. नदीच्या विविध टप्प्यांत, प्रवाह आणि काठ या ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था नांदत असतात. नदी उगमापासून संगमापर्यंत किंवा समुद्राला मिळेपर्यंत ती वेगवेगळी रूपे घेते. तिच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे परिसंस्थेमध्येही ती अत्यंत मोलाची ठरते. सामान्यतः नदीच्या उगमाचे पाणलोट, पुढे नदीचे पाणलोट, तिचे सपाटीवर वाहणे, पुढे एखाद्या मोठ्या नदीला किंवा समुद्राला जाऊन मिळणं हे नदीच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. या सर्वच टप्प्यांमध्ये अनेक उपटप्पेही असतात. उगम, धबधबे, पाणलोट, काठ, तळ, डोह, डबकी, वळणं, प्रपात ते खाडी मुख अशा नदीच्या प्रत्येक रूपात वेगवेगळी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण अशी परिसंस्था तयार होत असते.

नदीपात्रात उगमाजवळ बहुधा मोठाले खडक असतात. या मोठमोठे दगड आणि त्याभोवती तयार झालेले खाचखळगे हे एक स्वतंत्र आश्रयस्थान असते. तिथे वाढणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती, कीटक आणि जलचरांच्या प्रजाती असतात. त्यांची स्वतंत्र परिसंस्था असते.डोंगरातून पाणी खाली झेप घेते, अशा ठिकाणी लहान मोठे धबधबे असतात. इथेही विशिष्ट अशी उभी परिसंस्था तयार होते. येथे इतरत्र न आढळणारी विशिष्ट झुडपे, वेली, कीटक आणि पक्षी सापडतात. पुढे नदी थोडी सपाटीला आल्यानंतर पात्रातील दगडांचा आकार हळूहळू छोटा होत जातो.नदीचे प्रदूषण रोखणे हे एक मोठे आव्हान आहे. नदीचे पावित्र्य राखणे हे आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नदी आपली माता आहे, त्यामुळे नदीमध्ये रक्षा-जुनी कपडे-निर्माल्य टाकून तिचे पवित्र नष्ट करू नये.विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत आहे. जल, जंगल, जमीन, जन, जनावर हे पाच घटक एकमेकांशी पूरक असून, त्यांची योग्य सांगड घालून जल व पर्यावरण संवर्धन केले पाहिजे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नारायणराव म्हस्के म्हणाले, निर्सगाचा प्रत्येक घटक हा अन्न साखळी मधील महत्वाचा घटक आहे.
एक जरी कडी तुटली तर अन्न साखळी तुटेल. जल,जंगल, जमीन व जनावरे या चार घटकांचे रक्षणाची जबाबदारी पाचव्या घटकावर म्हणजे मानवावर (जन) आलेली आहे.अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक करण फोलाणे,तेजस्विनी गायकवाड, तृप्ती मिसाळ,निकिता गाडे, शिवानी मेथे, जोत्सना बडे, वृशाली मते,प्रकाश जावळे, सौरभ वाळुंजकर,संकेत ताकटे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी सिद्धेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदी काठी स्वच्छता मोहीम राबवली. सोनई महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बाळासाहेब खेडकर यांचे हस्ते उपस्थित स्वयंसेवकांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
डॉ.संजय महेर यांनी प्रास्ताविक केले.डॉ.मोहिनी साठे यांनी सुत्रसंचालन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.