नेवासा – ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने काम केले, त्याला त्याचं क्रेडिट मी देत असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, कुणीतरी बातम्या उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार. मात्र आता एकही नवीन जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका, असा दमही अजित पवारांनी महेश लांडगे यांनी जिल्हा विभाजनावर केलेल्या वक्तव्यावरुन भरला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या कार्यक्रमामध्ये महायुतीतील २ पक्षातील दादांमध्ये तुफान टोलेबाजी झाल्याचे पाहायला मिळाली. भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांनी संताप व्यक्त केला आणि शेलक्या शब्दांमध्ये अजित पवारांनी महेश लांडगे यांना सुनावल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच हा पॉलिटिकल ड्रामा रंगला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात महेश लांडगे यांनी देवेंद्र फडणवीसांचं तोंड भरून कौतुक केलं, पण अजित पवारांचं नाब घेणं टाळलं. महेश लांडगे त्यांच्या भाषणात म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड शहराची खरी ओळख २०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तायाला मंजुरी दिली आणि आज ते पुन्हा मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन सुद्धा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहराची ओळख पुण्याच्या खाली कुठेतरी लपल्यासारखी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण झालं आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचं महेश लांडगे म्हणाले.

लांडगे पुढे म्हणाले, मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्यांचे विभाजन होणार आहे. म्हणजे तुम्ही करणार असाल तर मी सांगतो माझा तसा काही उद्देश नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विभाजन करायचं झालं तर एका जिल्ह्याला शिवनेरी असं नाव द्यावं ही माझी विनंती, असे महेश लांडगे म्हणाले. या दोन्ही वक्तव्यावर अजित पवारांनी लांडगे यांना सुनावले.
अजित पवार म्हणाले, आता महेशने सांगितलं त्याला कायः वाईट वाटलं माझं नाव घ्यायला, मला माहिती नाही. परंतु, अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे, १९९२ला मी तुमचा खासदार झालो १९९२ ते २०१७ कोणी पिंपरी चिंचवड सुधारवलं ? आज २५ वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी-चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा, या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो, किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत. त्यांमुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका.

एवढाही कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे, ज्याने केले, त्याला त्याच क्रेडिट देत असतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडपणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. तसेच कुणीतरी बातम्या उठवतो, २६ जानेवारीला २१ जिल्हे जाहीर केले जाणार. मात्र आता एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. आता जे चाललंय ते चांगलं चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच काहीही बातम्या करू नका, असा दम देखील अजित पवारांनी भरला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.