ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नेवासा

पोलीस सुतावरून स्वर्ग गाठू शकतात असे म्हटले जाते. पोलिसांनी जर ठरवलं तर ते कोणत्याही आरोपीस कुठल्याही पद्धतीने जेरबंद करू शकतात. याचे अनेक उदाहरणे देखील समोर आहेत. दरम्यान आता अहमदनगरमधील एका खुनाचे कोडे पोलिसांनी 50 पैशांच्या पोस्ट कार्डचा वापर करून सोडवले आहे. निर्घृण खून करणारा खुनी पोलिसांनी अगदीच अनोखी शक्कल लावत पकडला आहे.

नेवासे तालुक्यातल्या पाचेगाव शिवारात लोखंडी फॉल, कारवाडी येथे बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी एक खुनाची घटना घडली होती. ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारुन निर्घृणपणे खून केला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडे होता.

स्थानिक पोलीस स्टेशनचे पाच आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक अशी एकूण सहा पथकं तपास करीत होती. गुन्ह्याच्या संबंधाने सुमारे १२० जणांची तपासणी करण्यात आली. घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरील अस्पष्ट आणि अंधूक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता घटनेच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती आणि कुत्र्याची हालचाल पोलिसांच्या निदर्शनास आली. तपासामध्ये अशी 30 वर्षीय व्यक्ती की जिच्याशी मृतकचा वाद होते आणि त्या व्यक्तीकडे श्वान होता अशा व्यक्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

आरोपीबाबत काही व्यक्तींना नक्की माहिती असणार परंतु चौकशीसाठी व ते सांगण्यासाठी कुणी पुढे येत नाही हे तपास अधिकारी धनंजय जाधव यांनी जाणले. धनंजय जाधव यांनी पोस्टातून ५० पैशांचे १०० कार्ड खरेदी करून त्या कार्डावर स्वत:चे नाव व पत्ता लिहून करवाडी व पाचेगाव शिवारात सदर कार्डचे वाटप करून आरोपींना ओळखत असाल तरच या कार्डवर आरोपीचे नाव लिहावे व सदर कार्ड कोणत्याही पोस्ट बॉक्समध्ये टाकावे, असे आवाहन केले होते.

या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमानं वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबतची माहिती दिली होती. पोलिसांनी पोपट सुदाम सूर्यवंशी या इसमाला शिताफीनं ताब्यात घेत चौकशी केली.सुरुवातीला त्यानं असं काही केलं असल्याबाबत नकार दिला. परंतू पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला व खून केल्याची पोपट सुदाम सूर्यवंशी याने कबुली दिली अन खुनाचे रहस्य उलगडले.

काही दिवसांपूर्वी मयत बाळासाहेब तुवर हे चिकन घेऊन दुसऱ्याच्या घरी बनवण्यास घेऊन जात असताना  त्यांची आणि आरोपी पोपटची भेट झाली होती. त्यादरम्यान त्यावेळी ‘तु दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो’, यावरुन आरोपी आणि मृतकचा वादविवाद झाला होता. त्यावेळी मृतकने आरोपी पोपटला मारहाण केली होती. याचा राग मनात धरुन आरोपीने त्याचा काटा काढायचं ठरवलं होतं.

दरम्यान, मंगळवारी 13 मार्च रोजी घटनेच्या दिवशी आरोपी हा मृतक यांच्या हॉटेलवर गेला. तेथे त्याने मृतकच्या डोक्यामध्ये दगडानं घाव घातले आणि तेथून तो पळून गेला, अशी कबुली त्यानं दिली.सदरचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव, पोलीस हवालदार बबन तमनर, पोलीस हवालदार केदार, पोलीस हवालदार कुसाळकर, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, गणेश फाटक, अंबादास जाधव, आप्पासाहेब तांबे आणि योगेश आव्हाड यांनी केला.

नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नेवासा
नेवासा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नेवासा
Share the Post:
error: Content is protected !!