मर्जीतील उमेदवार भरती, आप वंचित कडून जोरदार हरकत, गुरुवारपासून उपोषणाचा आपचा इशारा.
नेवासा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तालुक्यात शिक्षण, ग्रामपंचायत आदी विभागात मर्जीतील उमेदवारांची भरती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यास आम आदमी पार्टीसह वंचित बहुजन आघाडीने जोरदार हरकत घेऊन ही प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुक्यातील इच्छुक वंचित लाभार्थ्यांसह गुरुवारपासून नेवासा पंचायत समिती समोर उपोषणस बसण्याचा इशारा ‘आप’चे तालुकाध्यक्ष ऍड. सादिक शिलेदार यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आदी अधिनस्त आस्थापनांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी नेमण्याची प्रक्रिया अत्यंत संदिग्धपणे राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील तालुक्यात तब्बल 150 प्रशिक्षणार्थी भरती करण्यात आली आहे. तर शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थ्यांची भरती 23 ते 25 ऑगस्ट या कालावधीत करण्यात आली.
यासाठी 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास प्रेरित करण्याचे यासंदर्भातील परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. उमेदवारांना ज्या शाळेतील मंजूर पदसंख्या चार किंवा चारपेक्षा अधिक आहे अशा पुरेसे संगणकीय प्रणाली, साहित्य उपलब्ध आहे अशाच शाळांच्या आस्थापनेवर त्यांना शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देण्याचे नियोजन होते. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी गृहीत धरून 12वी पास प्रशिक्षणार्थ्यांना 6000 रुपये, पदवी, पदविका धारक प्रशिक्षणार्थ्यांना 8000 रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 10000 रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मात्र या योजनेची कुठलीही जाहिरात न करता प्रशासकीय पातळीवरच हे परिपत्रक फिरून सर्व संबंधितांच्या मर्जीतील प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. यासाठी शनिवार, रविवार हे शासकीय सुट्ट्यांचे दिवस अर्ज स्वीकारण्यासाठी निवडण्यात आले. तालुक्यातील इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांची यामुळेच मोठी गफलत होऊन त्यांची सोमवारी नेवासा पंचायत समितीत गर्दी झाली. मात्र संबंधितांनी त्यांना मुदत संपल्याचे कारण देऊन सदरच्या 88 जागाच्या नियुक्त्याही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशिक्षणार्थी भरतीमध्ये अनागोंदी झाल्याचे लक्षात आल्याने काही संतप्त वंचित उमेदवारांनी आम आदमी पार्टीचे ऍड.सादिक शिलेदार तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पोपट सरोदे यांना माहिती देऊन लक्ष घालण्याची विनंती केली. ऍड.शिलेदार आणि सरोदे येणार असल्याचे समजताच नेवासा पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी पळ काढला. ऍड. शिलेदार आणि सरोदे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तालुका शिक्षण अधिकाऱ्यांच्या सुचनेवरून उपस्थित कर्मचाऱ्यांनी इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यास पाच वाजल्यानंतर सुरुवात केली. यासाठी अर्ज करण्यासाठी सुचविण्यात आलेले शासकीय संकेतस्थळ चालूच नसल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांनी यावेळी केला.
बेरोजगारांची क्रूर थट्टा, उपोषण करणार – आप
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शिक्षण, ग्रामपंचायत आदी शासकीय स्तरांवर करण्यात आलेली प्रशिक्षणार्थ्यांची भरती प्रक्रिया सदोष आहे. बेरोजगारीची समस्या कमी करण्याच्या उदात्त हेतूला प्रशासनानेच काळिमा फासला आहे. सदरची योजना मनमानीपणाने राबवून प्रशासनाने तालुक्यातील बेरोजगारांची क्रूर थट्टा केली असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे ऍड. सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर यांनी करून गुरुवार पासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
वशिलेबाजी, आर्थिक गैरव्यवहार –
संबंधितांनी सदरची योजना अंधारात राबविताना वशिलेबाजीसह मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पोपट सरोदे यांनी यावेळी केला. या संपूर्ण भरती प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने राबविण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.