नेवासा – मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशासनाने मनमानी, अनगोंदी करून मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती केल्याच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या वतीने पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते .गट विकास अधिकारी संजय लखवाल तसेच गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी दिवसभरात आंदोलकांची समजूत काढण्याचा अनेकदा प्रयत्न केला. यासंदर्भातील त्रुटीबाबत तसेच ही प्रक्रिया रद्द करून नव्याने राबविण्याबाबत वरिष्ठाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता उपोषण स्थगित करण्यात आले.
याप्रसंगी आंदोलकांसमोर बोलताना आघाव म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. यानुषंगाने अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आदी अधिनस्त आस्थापनांवर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी नेमण्याची प्रक्रिया अत्यंत संदिग्धपणे राबविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अंतर्गत ग्रामपंचायत तसेच शहरी स्तरावर पन्नास हजार योजनादूत प्रशिक्षणार्थी भरती करण्यात आली आहे.
यासाठी 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास प्रेरित करण्याचे यासंदर्भातील परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. 12वी पास प्रशिक्षणार्थ्यांना 6000 रुपये, पदवी, पदविका धारक प्रशिक्षणार्थ्यांना 8000 रुपये तर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 10000 रुपये विद्यावेतन देण्यात येणार असुन मात्र या योजनेची कुठलीही जाहिरात न करता प्रशासकीय पातळीवरच हे परिपत्रक फिरून सर्व संबंधितांच्या मर्जीतील प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्त्या देण्यात आल्याची बाब आघाव यांनी निदर्शनास आणून दिली. यासाठी अर्ज करण्यासाठी सुचविण्यात आलेले शासकीय संकेतस्थळ चालूच नसल्याची तक्रार इच्छुक उमेदवारांनी केल्या आहेत.
राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड असून महायुती सरकारचा त्यांच्या प्रति खरोखरच जर प्रामाणिक हेतू असता तर त्यांनी ही भरती पारदर्शक प्रक्रिया राबवून केली असती. मात्र महायुतीतील घटक पक्षांच्या बगल बच्यांची राजकीय सोय लावण्यासाठी या गोंडस योजनेच्या माध्यमातून जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे असल्याची खंत आघाव यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आतबट्ट्याच्या कार्यपद्धतीने राबविण्यात आलेली असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित रद्द करून ही संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी आघाव यांनी यावेळी केली. यासंदर्भात लवकरच जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.वंचित बहुजन आघाडीचे पोपट सरोदे, संभाजी माळवदे, शोभाताई पातारे, शेतकरी संघटनेचे त्रिंबक भदगले, यांनी मनोगत व्यक्त केले.
उपोषणात आम आदमी पार्टीचे ॲड. सादिक शिलेदार, प्रवीण तिरोडकर, संदीप आलवणे, सलीम सय्यद, आण्णासाहेब लोंढे, देवराम सरोदे, विठ्ठल मैन्दाड, करीम सय्यद, आदी सहभागी झाले. यावेळी मराठा सेवा संघाचे रावसाहेब घुमरे, शिवसेनेच्या मीरा गुंजाळ, ज्योती तेलतुंबडे, काँग्रेसचे संदीप मोटे, शिवसंग्रामचे सुरेश शेटे तसेच दत्तात्रय निकम,साळुंके महाराज, संजय वैरागर, शेषराव गव्हाणे, शकुंतला कुसळकर, बबनराव आल्हाट, शोभाताई चव्हाण, सुखदेव भूमकर, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शिकाऊ प्रशिक्षणार्थी उमेदवारांची भरती २३ ते २५ तारखेला करण्याचे वरीष्ठ अधिकार्यांकडून पत्र असताना. दि. २६ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उमेदवार कार्यालयात आले असता . त्यांना ८८ पदा पैकी २२ उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले असल्याची माहीती कर्मचार्यांनी दिली व अर्ज स्वीकारले मात्र आता अधिकारी ८८ जणांना नियुक्ती दिल्याचे सांगत आहेत. हि प्रक्रिया राबवत असताना वृत्तपत्रात ,अथवा सोशल मीडियावर या बाबत कुठलीही जाहिरात न केल्याने मर्जीतील उमेदवारांची नेमणुक करण्यात आली असल्याचे दिसून येते.
– पोपटराव सरोदे वंचित बहुजन आघाडी.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.