महाविद्यालयांमध्ये विधी सेवा सहाय्य कक्ष
नेवासा – आपल्या देशात साधू-संतांची मोठी परंपरा आहे. समाजात नितीमुल्यामुळेच सुख-शांती होती. पाश्चात्य संस्कृतीमुळे नैतिकमूल्यांची घसरण, वाढती व्यसनाधिनता, यामुळे सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मितिची क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरुणांच्या हातामध्ये आहे. तरुणांनी सामाजिक बांधीलकी जोपासली तरच सुदृढ समाजाची निर्मिती होते, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी केले.
कलकत्ता येथिल प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या, तसेच मुंबई येथील शाळेतील बालकावरील अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे कायदेविषयक प्रबोधन करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदे विषयक जागृती शिबिरांचे आयोजन केले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि भास्कर पांडुरंग हिवाळे शैक्षणिक संस्था, अहमदनगर, पोलीस विभाग, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि.04) आयोजित केलेल्या कायदे विषयक जागृती शिबिरात न्यायाधीश भाग्यश्री का. पाटील बोलत होत्या. डॉ. रजनीश बर्नाबास, प्राचार्य, अहमदनगर महाविद्यालय, डॉ. नोवेल पारगे,उपप्राचार्य, अहमदनगर महाविद्यालय उपस्थित होते.
न्यायाधीश भाग्यश्री का. पाटील म्हणाल्या की, समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. विशेषतः महिला अत्याचाराबाबत जन्मठेप, फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. सदविवेक बुद्धी म्हणजेच कायदा असतो. त्यामुळे कोणीही मला कायदा माहित नाही, असा बचाव करू शकत नाही. सोशल मीडियाचा वापर करताना कोणाच्याही धार्मिक भावना. खाजगी जीवनाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पोस्को, रॅगिंग प्रतिबंधक कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील महत्वाच्या तरतुदींची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदे विषयक जनजागृतीबरोबरच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा टोल फ्री क्रमांक १५१०० व विविध योजनाविषयी माहिती देण्यात आली.
डॉ. पोपट शिणारे, प्राध्यापक अहमदनगर महाविद्यालय यांनी प्रस्ताविक केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. डॉ. पारकळ, प्राध्यापक अहमदनगर महाविद्यालय यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रवींद्र मते, प्राध्यापक, अहमदनगर महाविद्यालय यांनी आभार मानले.
विधी सहाय्य कक्षाचा शुभारंभ
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनींना त्यांच्या कायदेविषयक समस्यांच्या सोडवणुकीसाठी विधी सेवा प्राधिकरणाची मदत मिळावी, यासाठी महाविद्यालयात कक्ष स्थापन करण्यात आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचा टोल फ्री क्रमांक पत्ता आदी महत्वाची माहिती असलेल्या फलकाचे अनावरण ही करण्यात आले. विद्यार्थी आणि विद्यार्थीनी प्रतिनिधींची या कक्षासाठी समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.