नेवासा – ग्रामदैवत श्री मोहिनीराज महाराज यांच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुरक्षितता राखण्याचे मोठे आव्हान नेवासा पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. या कामी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची भूमिका यंदा अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मात्र, केवळ शांतता समितीच्या बैठकीत ‘हात जोडून’ विनंती करून किंवा सहकार्याचे आवाहन करून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहणार नाही.

कायदा मोडणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि भाविकांना सुरक्षिततेची खात्री देण्यासाठी त्यांना कायद्याचा धाक दाखवून प्रसंगी ‘हात वर’ म्हणजेच कठोर व तात्काळ कारवाईची ठाम भूमिका घ्यावीच लागेल, अशी आग्रही अपेक्षा नेवासकरांकडून व्यक्त होत आहे.मागील काही वर्षांच्या यात्रा अनुभवाकडे पाहता, या काळात अवैध दारूविक्री, जुगार, बिंगो, सट्टा, पाकिटमारी, मोबाईल चोरी आणि छेडछाडीचे प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येते. गर्दीचा गैरफायदा घेऊन सक्रिय होणाऱ्या गुन्हेगारांमुळे ग्रामीण भागातून आलेले भाविक तसेच छोटे व्यापारी आर्थिक फसवणुकीला बळी पडतात.
या अवैध अड्ड्यांमधून वाद, हाणामारी आणि दहशतीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत व तशी शक्यता कायम असते. त्यामुळे तक्रारींची वाट न पाहता प्रतिबंधात्मक कारवाई, गुप्त पथकांची नेमणूक आणि अवैध अड्ड्यांवर अचानक छापे टाकणे अत्यावश्यक ठरणार आहे.यात्रेतील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची सुरक्षितता हा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. काही फुकटात मौज करणारे व स्वतःला ‘भाई’ म्हणून मिरवत व्यापाऱ्यांना धमकावणारे ‘भुरटे युवक’, तसेच फटाक्यासारखा आवाज करणाऱ्या मोकाट सायलेन्सरयुक्त दुचाकींवर स्वार ‘हुल्लडबाज’तरुणांना वेळीच वेसण घालणे गरजेचे आहे.

केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर पोलिसांची ठळक उपस्थिती, पायी गस्त आणि तात्काळ हस्तक्षेप केल्यास तो अधिक प्रभावी ठरेल. सुरक्षित वातावरण मिळाल्यासच मोहिनीराज यात्रेचा सोहळा खऱ्या अर्थाने भक्तीभावात पार पडू शकतो.चौकट – ‘करे पॅटर्न’ची आजही आठवण!श्री मोहिनीराज यात्रेच्या संदर्भात आजही तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या कार्यकाळातील कडक व शिस्तबद्ध बंदोबस्ताची आठवण काढली जाते.

प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केलेली कारवाई, हुल्लडबाजांवर जागेवरच बसवलेला वचक आणि अवैध धंद्यांवर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्या काळात भाविक व व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची ठोस भावना निर्माण झाली होती. हाच ‘करे पॅटर्न’ आजही गरजेचा असून, पोलीस प्रशासनाकडून तशीच सक्रिय, ठाम आणि परिणामकारक भूमिका अपेक्षित असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

