आज खरंतर लेखणीही थरथरतेय आणि अश्रूंचा बांध फुटलाय. कुटुंबावर आलेलं संकट स्वप्न तर नाही ना याच मन सारखं चाचपणी करतंय. खरच हे संकट आहे की आयुष्यभर न संपणार युद्ध. हाच प्रश्न मनाला सारखा भेडसावतोय.
काही व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्यात वेगळे स्थान निर्माण करतात. आणि अगदी घट्ट नात निर्माण होत काय आणि काहीच न बोलता न सांगता आपल्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर जो त्रास होतो तो भयंकर असतो. त्या व्यक्तीच्या जाण्याच्या ज्या वेदना असतात त्या काळजाला भेदून जातात.त्याच काळजाला होणाऱ्या वेदनांपेक्षा अती भयंकर असतात.

त्यासाठी कुठलाच मलम आजपर्यंत कुठल्याच मेडिकल मध्ये मिळत नाही, किंवा कुठलाच डॉक्टर त्यावर इलाज करत नाही. असच काहीस माझ्या आयुष्यात घडलं.
१९ जुलै २०२१ साली माझे लग्न नेवासा तालुक्यातील प्रतिष्ठित असलेले कै. बाळासाहेब सोन्याबापू रासने यांच्या मुलाशी म्हणजे अमित रासने यांच्याशी झाला. रासने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी माझे जवळचे ऋणानुबंध जुळले गेले आणि प्रत्येक व्यक्तीची आणि व्यक्तीसोबत असलेल्या नात्याची मला प्रचंड सवय होऊन गेली. रासने कुटुंब तसे मुळातच प्रतिष्ठित आणि सुशिक्षित.प्रचंड एकी असलेले हे रासने कुटुंब. मुळचे नेवासा तालुक्यातील चांदा गावचे. येथील जयप्रकाश रासने, सूर्यकांत रासने, चंद्रकांत रासने, लक्ष्मण रासने, सोन्याबापू रासने, रमाकांत रासने, बाळू काका रासने हे सर्व जण भाऊ. पेशा मात्र निरनिराळा.माझे आजोबा मा. जिल्हा परिषद सदस्य तुकाराम सोन्याबापू शेंडे यांचे आणि रासने परिवाराचे अतिशय जुने व निकट संबंध,आणि रासने परिवाराबरोबर माझा कधीही संबंध न आलेला माझा आंतरजातीय प्रेमविवाह कै. बाळासाहेब रासने यांच्या मुलाशी अमित शी अगदी थाटामाटात झाला. आमित चे सर्वच कुटुंब तसे प्रेमळ आणि अतिशय मायाळू. लग्नानंतर मला पटकन आपलेसे करून घेणारे ठरले. कधीच परकेपणाची जाणीव मला झाली नाही. रासने परिवार सुशिक्षित आणि दिमाखदार, यांच्यात मी कधी हरवले समजले नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी माझी नाळ जोडली गेली.

चांदा गावातील हे ज्येष्ठ सात भाऊ. जयप्रकाश व सूर्यकांत रासने यांनी अतिशय कष्टातून नेवासा शहरात स्थलांतर करून भांडी विकण्याचा व्यवसाय सुरु केला आणि सोबत कुटुंबाचा ही जम बसवला. त्यांचेच धाकटे भाऊ रमाकांत रासने व बाळू काका रासने यांनी घोडनदी येथे जाऊन आपल्या भांडी व बांगडी व्यवसायास नावलौकिकता मिळवली. लक्ष्मण रासने यांनी श्रीरामपूर येथे आपला व्यवसाय वाढवला. मात्र सोन्याबापू रासने पेशाने शिक्षक असल्या कारणाने चांदा येथेच आपल्या गावी स्थित होते. तर थोरले चंद्रकांत रासने शेतीमध्ये राबत होते,त्यांनी अनेक वर्ष बांगड्यांचा व्यवसाय करत चांदा येथे आज ही बाजारपेठेत बांगडीचे दुकान पहायला मिळते.हे ज्येष्ठ सात भावंड आज हयात नाहीत, परंतु त्यांच्या मुलांनी आपापल्या वडिलांनी व्यवसायाचे बसवून दिलेले जम अतिशय कष्टाने सांभाळतायेत. यातच सोन्याबापू रासने यांचे धाकटे चिरंजीव कै. बाळासाहेब रासने मा. जि. प. सदस्य. सर्व जिल्हाभर न्यात आहेत.अतिशय हुशार व समाजासाठी झटणारे, समाजातील प्रत्येक कुटुंबाला आपले समजून सुख दुःख वाटून घेणारे, हे विश्वची माझे घर समजून प्रत्येक कुटुंबाच्या अडचणीत उभा राहणारा हा कर्तृत्ववान योद्धा… माणूस हीच जात,मानवता हाच धर्म, समता हीच देवता, हीच खरी राष्ट्रिय एकात्मता मानणारे बाळासाहेब रासने १२ फेब्रुवारी २०१२ साली त्यांचे निधन झाले. आपला लक्ष्मणाप्रमाणे असणारा भाऊ उघड्या डोळ्यांनी जाताना दिसला आणि आयुष्याच समीकरण चुकल्यासारखं वाटलं आणि २०१३ साली कै. रत्नाकर रासने वरिष्ठ अधिकारी महावितरण, यांचे निधन झाले. कोरोनाच्या काळात कुटुंबातील सूर्यकांत रासने जयप्रकाश रासने ही जेष्ठ मंडळी गेली आणि खऱ्या अर्थाने रासने परिवार पोरका झाला. राजकारण, सामाजिक,धार्मिक, कार्यात नेहमी अग्रेसर असणारा हा रासने परिवार. या ज्येष्ठ सात भावंडांकडून मिळालेला बाळकडू व वसा त्यांची मूल अतिशय हुशारीने आजही सांभाळतायेत.
आणि अश्यातच एक वेळ अशी आली आणि रासने कुटुंबाला नजर झाली. आणि त्यांचे अंगण उजाड झाले. वैऱ्याची रात्र परिवारात घुसली आणि होत्याच नव्हत करून गेली.

चंद्रकांत रासने यांचे चिरंजीव अरुण रासने रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या पत्नीला घेऊन मालेगाव येथे गेले होते. त्यांच्या घरी त्यांच्या आई सिंधुबाई म्हणजे आमच्या सर्वांची ताई आज्जी, मुलगा मयूर, सुन पायल, नातू अंश व चैतन्य हे घरीच होते. रात्रीच्या सुमारास झोपायला गेलेल्या माणसाला देव कायमचाच झोपवेल यावर खरतर विश्वास बसत नाही.
रविवारच्या मध्यरात्री नेवासा फाटा येथील स्थित असलेले कालिका फर्निचर दुकानाच्या पाठीमागील गोदामास शॉर्ट्सर्किट होऊन आग लागली. आणि गोदामाबरोबर मयूर भाऊजींच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली. खरतर मयूर भाऊजी आणि माझे नाते दीर भावजय चे जरी होते तरी त्यात मैत्रीचा स्नेह जास्तीचा होता.आणि ज्याला आपण घराचे कुलूप आणि कुटुंबाचा कणा म्हणतो ती म्हणजे जुन्या विचारसरणीच्या आणि जुन्या पिढीतील संपूर्ण चांदा गावाला हव्या हव्याशा वाटणाऱ्या ताई आज्जी. ताई आज्जी चे माझ्यावर खूप प्रेम. बाजारपेठेत चक्कर मारायला गेल्यानंतर ताई आज्जी नेहमी दुकानात दिसायच्या. केस विंचारलेले, कपाळाला काळा बुक्का आणि पितांबरी लुगड नेसलेल्या. दुकानाच्या दारात बसून मला हाक मारायच्या. बाळाची विचारपूस नातवाची म्हणजे अमितची आणि आईची विचारपूस करायच्या. मला गप्पा मारायला बोलायच्या आणि देवादिकांचे सोहळे शिकवायच्या. ताई आज्जी मला नेहमी म्हणायच्या, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत एका वहीत सर्व सोहळे लिहून ठेव तुला कामी येतील.आणि आवर्जून सांगायच्या सविताला फोन कर सविता म्हणजे ताई आज्जी ची मुलगी तिला सांग ताई आज्जी तुझी खूप वाट बघतीय. चार दिवस मला घेऊन जा म्हण. ताई आज्जी चा आणि माझा फार सलोखा आणि प्रेम. ताई आज्जी आयुष्यात कधीच न विसरता येणार व्यक्तिमत्व. काही माणसं आयुष्यात येतात आणि जीवाला चटका लाऊन जातात.तशीच पायल अतिशय शांत आणि मनमिळाऊ माझी मानाने लहान लहान असलेली जाऊबाई. परंतु आम्ही कधीच ते जावेचे नाते लावले नाही.

अंश आणि चैतन्य हे अतिशय निरागस लेकरं. अंश ला माझे आणि अमित काकाचे प्रचंड आकर्षण. अतिशय मनमिळाऊ असणारा अंश आज आमच्यात नाही यावर विश्वास बसत नाही.. मयूर भाऊजींनी कधी सख्खे चुलत भेद केला नाही. मला एक गोष्ट आठवते २०२३ साली मयूर भाऊजींनी हॅरियर गाडी घेतली, दुपारी 1 वाजता मला फोन आला वहिनी गाडी घेतली आणि त्या गाडीची पुजा मला तुमच्याच हातून करायची. असा हट्ट धरला. खर तर यात किती प्रेम होत. भाऊजी अमित पेक्षा खूप लहान होते तरी ते मला नावाने आवाज द्यायचे मी त्यांना म्हणायचे मला वहिनी म्हणा असा हट्ट धरायचे.ते हसून अजून जास्त चेष्टा करायचे.माझ्या लग्नानंतर खरतर रासने परिवार मला नवीन होता परंतु सर्वांनी मला आपलस करून घेतलं. यातच कुटुंबावर काळाने घाव घातला. आईच्या कुशीत निजलेली अंश आणि चैतन्य आईच्याच कुशीत कायमची निजली..आणि रासने परिवारातील चिमुकल्या पावलांचा ठसा हरवला. खरतर अतिशय विचार करायला लावणारी ही घटना आहे,गोदामाला आग लागते काय आणि एकाच कुटुंबातील पाच जण होरपळून श्वास गुदमरून मरण पावतात काय ही काळजाला चटका लावणारी गोष्ट आहे.यात अरुण काका आणि काकी च्या मनाला जी वेदना होतेय ती आम्ही सर्व परिवार जवळून पाहतोय.आणि हाच प्रश्न मनाला विचारतोय की या घटनेतून आमचा परिवार सावरेल काय?..
खरतर रासने परिवार अतिशय मोठ्या दुःखाच्या सागरात बुडाला आहे. आमचं हसत खेळत घर होत्याच नव्हत झालयं. रासने परिवारासाठी हे दुःख आता कधीही न संपणार सांत्वनापलीकडीच युद्धच ठरणार आहे…
सूर्याच्या गोळ्या तू खरा
धीरोदात्त आहेस
अंत माहित असूनही
रंग उधळतो आहेस….
शब्दांकन
माया अमित रासने/ शेंडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

