
भेंडा – मुलांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून दूर ठेवत मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने मुलांच्या पालकांचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी दिली.

हल्लीच्या काळात मुले मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर अवलंबून असल्याने मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होत असून शारीरिक तंदुरुस्तीही धोक्यात येत आहे. मोबाईलचा अतिवापर ही जागतिक समस्या बनत चालली असून, मुलांना पुन्हा मैदानाकडे वळवण्यासाठी असे उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचे मत न्यायाधीश दिनकरराव आरगडे यांनी व्यक्त केले.

खेळ म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर शारीरिक हालचाल, सांघिक भावना आणि मानसिक सक्षमतेचा पाया आहे. मैदानावरील संघर्षच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास देतो. मोबाईलवरील खेळ हे या खेळाच्या मूळ आत्म्यापासून दूर नेत असल्याने पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन यावर उपाय शोधणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुलांना पुन्हा मैदानी खेळांकडे आकर्षित करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील क्रिकेट संघांचे सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता. यात ग्रामपंचायत संघ, २२० के.व्ही. सबस्टेशन संघ, शिवतेज संघ, सुधीरभाऊ संघ, सचिनभाऊ संघ, ओल्ड ११ सौंदाळा, आदर्श संघ यांचा समावेश होता.

स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये शिवतेज संघ, सेमी फायनलमध्ये २२० के.व्ही. सबस्टेशन संघ, तर फायनलमध्ये श्रीदत्त ११ संघ विजयी ठरला. विजेत्या संघासह उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी व बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
या वेळी न्यायाधीश दिनकरराव आरगडे, संजय आरगडे, ज्ञानेश्वर आरगडे, भिवसेन गरड, किशोर मुरकुटे, विजय मुरकुटे, सर्जेराव चामुटे, महेश चामुटे, किशोर चामुटे, बाळासाहेब बोधक, बंडु आरगडे, प्रमोद चामुटे, बाबासाहेब आरगडे, चंद्रकांत आरगडे, कल्याण ठुबे, बबन आरगडे, राजेंद्र आरगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

