नेवासा – “पाणी केवळ पिण्यासाठी किंवा शेतीपुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण परिसंस्थेचा तो कणा आहे. जंगले आपल्याला ऑक्सिजन व निवारा देतात, तर जमीन अन्नाची गरज भागवते. त्यामुळे जल, जंगल आणि जमीन या तिन्ही नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे सुरक्षित भविष्यासाठी अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाच्या वतीने नजिक चिंचोली येथील खडेश्वरी मंदिर परिसरात विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ‘पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभाग समन्वयक डॉ. संजय महेर होते.
फुलारी म्हणाले, “जमीन ही एक प्रयोगशाळा असून शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. निसर्गाने दिलेले पावसाचे पाणी जमिनीत जिरवणे व त्याचा योग्य वापर करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी सलग समपातळी चर, कंपार्टमेंट बंडिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, माती नाला बांध व सिमेंट बंधारे असे उपचार पाणलोट क्षेत्रात करणे गरजेचे आहे. पाणी उपलब्ध झाले की पडीक जमीनही उत्पादनक्षम करता येते.”
ते पुढे म्हणाले की, जमीन विकासासाठी माती परीक्षण करून सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक आहे. शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत व हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारते. तसेच पडीक जमिनीच्या विकासासाठी जीआयएस नकाशांचा वापर आणि योग्य पीक नियोजन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
या प्रसंगी खडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद महाराज, ज्येष्ठ पत्रकार संतोष औताडे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. मोहिनी साठे, कार्यक्रम अधिकारी प्रा. वैभव लाटे, प्रा. देविदास सोनवणे, प्रा. सुलतान आत्तार, रमेश भालेकर यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अदिती लोखंडे हिने केले, तर आभार कु. अक्षदा फुलारी हिने मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

