नेवासा – विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय स्पष्ट असेल, तर यशाची वाटचाल निश्चितच सुकर होते. विद्यार्थी जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन आणि चांगले संस्कार यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रेरणादायी प्रतिपादन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुळा एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानेश्वर महाविद्यालय (नेवासा) यांच्या संयुक्त विद्यमाने हंडीनिमगाव येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सातत्य, परिश्रम आणि संयम आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपले दैनंदिन वेळापत्रक ठरवावे. अभ्यास, शारीरिक कसरत आणि संस्कार या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास विद्यार्थी समाजासाठी आदर्श नागरिक बनू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज होते. त्यांनी श्रमदानाचे महत्त्व सांगत आई-वडिलांचा आदर राखणे आणि सामाजिक जबाबदारी जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. यावेळी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे आणि बाळासाहेब पिसाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान आलेल्या अनुभवांविषयी अजित चौरे, अनुष्का सदाफळ, वेदांत बोलके, भारती दारुंटे, विशाल हपसे आणि सलमान शेख या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.या कार्यक्रमास किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, प्रा. डॉ. एन. डी. शेख यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. नवनाथ आगळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश गारुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. कार्तिकी नांगरे यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

