नेवासा – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथील प्रसिद्ध जागृत काल भैरवनाथ देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते सोम दि 19 जाने रोजी संपन्न होणार आहे.

माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे रस्ता काम मंजूर झाल्याने बहिरवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
श्री क्षेत्र बहिरवाडी येथील काल भैरवनाथ देवस्थानास नेवासा तालुक्यासह संपूर्ण जिल्हा व राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मात्र देवस्थानाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाल्याने भाविकांना तसेच ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बहिरवाडी ग्रामस्थांनी तत्कालीन मंत्री आमदार शंकरराव गडाख यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
आमदार गडाख यांनी तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर पर्यटन विकास निधीतून नेवासा बुद्रुक ते बहिरवाडी देवस्थान या सुमारे साडेसहा किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती. यानंतर कामाची वर्क ऑर्डरही जारी करण्यात आली. मात्र सरकार बदल झाल्यानंतर जुलै 2022 मध्ये या रस्त्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली.
स्थगिती उठवण्यासाठी तत्कालीन आमदार शंकरराव गडाख यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येत ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने स्थगिती उठवली. त्यानंतर जुलै 2024 मध्ये रस्त्याच्या कामाची नव्याने वर्क ऑर्डर काढण्यात आली.

या रस्त्याच्या मंजुरीसाठी देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनीही आमदार गडाख यांच्याकडे सूचना केली होती स्थगिती उठवल्यानंतर ग्रामस्थांनी उद्घाटन करण्याची विनंती आमदार गडाख यांच्याकडे केली होती. मात्र उद्घाटन सोहळा देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज व महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते व्हावा, अशी माजी मंत्री शंकरराव गडाख यांची इच्छा होती.
त्यानुसार महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
आमच्या श्रद्धास्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.मा. आमदार शंकरराव गडाख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. आज उद्घाटन सोहळा महंत प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते होत असल्याचा आम्हा सर्व ग्रामस्थांना अत्यंत आनंद आहे,” असे बहिरवाडी (धामोरी) चे सरपंच आनंद नांगरे यांनी सांगितले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

