नेवासा – नेवासा फाटा येथील साईसेवा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या ३२ वर्षीय महिलेला भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणाचा आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण वडार समाज या प्रकरणात आक्रमक झाला असून, गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मृत महिलेचे नाव रेशमा श्याम इरले (वय ३२, रा. नेवासा) असून, तिच्या गर्भपिशवीत गाठ आढळून आली होती. त्या उपचारासाठी १८ एप्रिल रोजी नेवासा फाटा येथील साईसेवा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते.

डॉ. त्रिभुवन यांनी २१ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया होईल, असे सांगितले असतानाही, भूलतज्ज्ञ डॉ. चावरे यांनी नियोजित वेळेपूर्वीच, २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भूल देऊन ऑपरेशन केले. भूल दिल्यानंतर रेशमा यांची प्रकृती अचानक खालावली. संकटजनक स्थितीमुळे त्यांना नगर येथील सुरभी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच २० एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. नातेवाईक व वडार समाजाने रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
या घटनेनंतर वडार समाजाने नेवासा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयात निवेदन देत दोषींवर
कठोर कारवाईची मागणी केली आहे. समाजाच्या प्रतिनिधींनी २१ एप्रिल रोजी डीवायएसपी संतोष खाडे यांची भेट घेतली. त्यांनी तीन दिवसांत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र २३ एप्रिलपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने वडार समाज आक्रमक झाला आहे. रेश्मा इरले यांच्या पतीकडून रुग्णालय प्रशासनाने जबरदस्तीने वैद्यकीय कागदपत्रांवर सह्या व अंगठा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीला लिहिता-वाचता येत नसल्याचा गैरफायदा घेतल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आमच्या बहिणींच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गरज पडल्यास मंत्रालयासमोरही आंदोल करू, असा इशारा बिटू लष्करे, सुनील धोत्रे, माऊली तोडमल, काळू आळपे, अंबादास मस्के, कैलास धोत्रे या सर्वांनी वडार व हिंदुत्ववादी समाजाच्या नेतृत्वाने दिला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी सकल वडार समाजाची मागणी असून, याबाबतीत प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी संतोष खाडे व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव तसेच तहसीलदार संजय बिरासदार यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांनाही संपूर्ण माहिती देण्यात येऊन डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस प्रशासनाने व तहसीलदार यांनी वडार समाजाला सांगितली. यावेळी वडार समाज उपस्थित होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.