नेवासा – 29 जुलै हकीकत अशी की, मंगळवार दि. 29 जुलै रोजी पहाटे नेवासा पोलिसांचे पोलीस वाहन पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ व चालक संतोष खंडागळे यांच्या सह रात्रगस्त करीत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास भेंडा फॅक्टरी जवळ दोन संशयित मोटर सायकलवर वेगात जाताना दिसून आले. रात्रगस्तवरील पोलिस वाघ व खंडागळे यांना संशय आल्याने त्यांनी मोटर सायकल थांबवण्याचा प्रयत्न केला असता कट मारून मोटर सायकल चालक कुकानाकडे वेगाने निघून गेला. त्यावेळी असं लक्षात आले की दोघांपैकी एक जण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्यानंतर तातडीने नाकाबंदी सुरू करून रात्रगस्तवरील पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना नांदूर शिकारी गावाजवळ पकडले. दोघांना नाव गाव विचारले असता सचिन रमेश पन्हाळे वय 25 वर्ष व आदित्य संतोष जाधव वय 21 वर्ष दोन्ही राहणार शेवगाव असे सांगितले. पाठलाग करीत असताना दोघांनी हातातून काही तरी फेकल्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांना विचारपूस केले असता काहीही फेकले नाही असे सुरुवातीला सांगितले.

परंतु पोलीसी खाक्या दाखवताच दोन गावठी कट्टे फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी पुन्हा माघारी जाऊन शोध घेतला असता दोन देशी कट्टे मिळून आले. सदर कट्ट्या बाबत विचारपूस केली असता सदरचे कट्टे मध्यप्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचे सांगितले. आरोपीकडून 20 हजार रुपये किमतीच्या गावठी कट्ट्यांसह एक टीव्हीएस स्टार मोटर सायकल, दोन मोबाईल असा एकूण 75000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत दोन्ही आरोपींवर पोलीस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे नेवासा येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस हवालदार शहाजी आंधळे हे करीत आहेत.
सचिन पन्हाळे यांच्यावर यापूर्वी पोलीस ठाणे शेवगाव, एमआयडीसी व नेवासा येथे दंगल घडवुन आणणे, अग्नीशस्त्र बाळगणे, जंगली प्राण्यांची तस्करी करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे 4 गुन्हे दाखल आहेत.

सचिन पन्हाळे यास मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी अग्नी शस्त्र हवेत मिरवताना नेवासा पोलिसांनी रंगेहात पकडले होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस रिमांडकामी आज माननीय न्यायालयात हजर केले जाणार आहे.
आरोपींनी कट्टा कोणाकडून आणला, कशासाठी आणला होता, उद्देश काय होता, यात सहभागी कोण कोण आहेत या बाबतचा तपास बारकाईने करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, पोलीस हवलदार शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल संतोष खंडागळे, वाल्मीक वाघ, नारायण डमाळे, वासुदेव डमाळे व गणेश जाधव यांनी केली आहे.
नागरिकांकडे अशा कट्ट्यांबाबत काही माहिती असल्यास न भिता ती प्रत्यक्ष भेटुन किंवा मोबाईल कॉल करून देण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.