
वडुले – नेवासा तालुक्यातील वडुले येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून राज्य सरकारला जबाबदार धरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब सुभाष सरोदे (वय 44) असे आहे. त्यांनी शेतातच विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी बनवलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

व्हिडीओमध्ये सरोदे यांनी म्हटले आहे की, “मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. कर्जमाफी होईल या आशेवर जगत होतो. दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले, पण कर्जमाफी केली नाही. आजचे सरकार अर्थव्यवस्थेच्या नावाखाली औद्योगिक विकासासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. बजेटमध्ये आमच्यासाठी काहीच नाही. योग्य वेळी मदत झाली असती तर आज मी हा टोकाचा निर्णय घेतला नसता.”

यापुढे त्यांनी आपल्या कुटुंबासाठी मदत मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात आई, पत्नी अर्चना, मुलगी किरण, दोन मुले सूरज (17) व रोशन (14), तसेच भाऊ व इतर कुटुंबीय आहेत. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून वडुले ग्रामस्थ आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवारी सकाळी 9 वाजता वडुले येथे निषेध सभा आयोजित करण्यात आली, अशी माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांनी दिली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

