नेवासा, 21 ऑगस्ट 2025 | सचिन कुरुंद – नेवासा कॉलेजजवळील कालिका फर्निचर या दुकानात सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रासने कुटुंबातील सर्व सदस्य या आगीत जळून मृत्युमुखी पडले असून, संपूर्ण नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
रविवारी रात्री सुमारे 1:00 वाजता अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. झोपेत असलेल्या कुटुंबीयांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी बचावासाठी प्रयत्न केले, परंतु आगीचा भडका इतका तीव्र होता की कोणालाही आत शिरणे शक्य झाले नाही.

शॉर्टसर्किटचा संशय, तपास सुरू
या दुर्घटनेमागे शॉर्टसर्किटचं संभाव्य कारण समोर येत आहे. विद्युत तांत्रिक बिघाडामुळेच आगीची शक्यता वर्तवली जात असून, महावितरण आणि पोलिस विभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. आग कशामुळे लागली हे अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी व भेट
दुर्घटनेची माहिती मिळताच अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घटनास्थळी भेट देऊन कालिका फर्निचरची पाहणी केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना सांत्वनपर शब्द दिले आणि प्रशासन त्यांच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी तातडीच्या मदतीचे आदेश देखील दिले आहेत.
त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी संतोष लांडगे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, तहसीलदार संजय बिरादार, तपासी अधिकारी अमोल पवार आणि महावितरणचे अधिकारी कानडे उपस्थित होते.

या दुर्दैवी घटनेने नेवासा शहर हादरले आहे. एकाच कुटुंबाचा झालेला दुर्दैवी अंत पाहून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक, राजकीय व व्यापारी वर्गातून संवेदना व्यक्त केल्या जात असून, सोशल मीडियावर शोकसंदेशांचा ओघ सुरू आहे.
नागरिकांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वीज व्यवस्थापनात दक्षता घेण्याची मागणी केली आहे. अनेकांनी स्वतःच्या घरातील विजेच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
अंतिम निष्कर्षांची प्रतीक्षा
दरम्यान, पोलिसांकडून पंचनामा सुरू असून, महावितरण विभागाकडूनही स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
ही दुर्घटना केवळ एक कुटुंबीयांची हानी नाही, तर संपूर्ण समाजाला एक दक्षतेचा इशारा आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.