गणेशवाडी – शिर्डी – संभाजीनगर ते अहिल्यानेगर मार्गे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ अत्यंत दयनीय अवस्थेत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व घोडेगाव ग्रामस्थांनी केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
खासदार वाकचौरे यांनी निवेदनात नमूद केले की, या महामार्गावरील डांबरीकरण पूर्णपणे मोडून गेले असून रस्ता खड्ड्यांनी आणि उंचसखल पॅचांनी भरलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांचा प्रवास धोकादायक ठरत असून, अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे. अनेक वेळा गंभीर अपघात टळले असले तरी किरकोळ अपघात घडल्याची उदाहरणे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

याशिवाय रस्त्यावरील सुविधा अपुऱ्या व दुर्लक्षित अवस्थेत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी बसवलेले डिव्हायडर तसेच त्यावरील बेकायदेशीर कट यामुळे वाहतुकीचा वेग खंडित होतो आणि मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. तसेच पावसाळ्यानंतर रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्या जवळजवळ पूर्णपणे अदृश्य झाल्या असून, विशेषतः रात्री वाहनचालकांना मोठा धोका निर्माण होतो.
खासदार वाकचौरे यांनी पुढे नमूद केले की, या महामार्गाच्या देखभालीचा करार ३ सप्टेंबर २०२५ रोजी संपला असून, मागील कंत्राटदाराने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या हा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे.

या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून मोडक्या डांबरी पृष्ठभागाची दुरुस्ती करावी,रस्त्याची रचना पुनर्विचारात घेऊन अनावश्यक डिव्हायडर हटवावेत, रस्त्यावरील पट्ट्या (लेन मार्किंग) पुन्हा रंगवून वाहनांना सुरक्षित मार्गदर्शन द्यावे.
, नवा देखभाल करार जबाबदार व सक्षम कंत्राटदाराला देऊन वेळेत दर्जेदार काम करावे.
ही समस्या केवळ सोयीची नसून सार्वजनिक सुरक्षेशी निगडित असल्याने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे खासदार वाकचौरे यांनी ठामपणे मांडले.
याबाबत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती खासदार वाकचौरे यांनी पत्रकारांना दिली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.