नेवासा – नेवासा बसस्थानकात शौचालय वापराचे पैसे मागितले असता, प्रवाशाने “पैसे घ्या, पण स्वच्छता ठेवा” असे बोलून स्वच्छतेबद्दल प्रश्न विचारला. या क्षुल्लक कारणावरून संबंधित कर्मचाऱ्याने प्रवाशाला निर्देयपणे गजाने मारहाण केली, ज्यात त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. या अमानुष घटनेबद्दल शहरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
सदर घटना काल सकाळी दहाच्या सुमारास नेवासा बस स्थानकात घडली. बुलढाणा येथे जाणारे एक प्रवासी दांपत्य आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह थांबले होते. यातील प्रवासी पुरुषाने शौचालयाचा वापर केला. परत येताना कर्मचाऱ्याने त्याच्याकडे दहा रुपयांची मागणी केली. प्रवाशाने “पैसे घ्या, पण स्वच्छता नाही, सेवा नाही, तरीही हे काय? स्वच्छता ठेवा” असे म्हणत प्रश्न विचारला. यामुळे कर्मचाऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने प्रवाशाला मारहाण केली! डोक्यातून रक्ताच्या धाराच वाहू लागल्या. हे सर्व बस प्रशासनासमोर घडले, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले.

लोकांच्या डोळ्यांसमोर ही अमानुष घटना घडली, पण प्रशासन जणू आंधळे झाले आहे — ना कृती, ना चौकशी! मारहाणीच्या वेळी प्रवाशाची पत्नी आणि चिमुकली मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होत्या. घटनास्थळी पोलिस दाखल झाले, परंतु प्रवाशाला धमकावल्याने आणि बाहेरगावचे असल्याने जखमी प्रवासी पत्नी व मुलीसह तक्रार न देता निघून गेला. ही घटना बसस्थानकातील भ्रष्ट आणि बेफिकीर व्यवस्थेचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाली आहे.
प्रवाशाला मारहाणीची घटना घडलेली असतानाच, दुसरीकडे महिलांच्या मूलभूत गरजांवर पैसे आकारणे हे नेवासा बसस्थानकाचे दुर्दैवी वास्तव आहे. महिलांकडून अगोदरपासूनच केवळ लघुशंकेसाठी पाच रुपये ‘शौचालय कर’ घेतला जातो.शालेय शिक्षणासाठी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना अनेकदा पैसे नसल्यामुळे स्वच्छतागृहात प्रवेश नाकारला जातो. ही लाजिरवाणी गोष्ट असून, बस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

“बसस्थानक प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय आहे. महिलांना व विद्यार्थिनींना मूलभूत सुविधा न देणे, तसेच पैसे मागितल्यावर विरोध केल्यावर गजाने मारहाण करणे हे संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करते. यात तत्काळ सुधारणा झाली नाही तर आंदोलन छेडले जाईल.”
– अनिल ताके पाटील (अध्यक्ष, प्रवासी संघटना)
“पैसे आकारणी बद्दल मी वरिष्ठांना यापूर्वीच कळवले आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. माझ्या हातात सध्या काहीही अधिकार नाही. हा निर्णय उच्च अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.”
– प्रशांत होले (आगार व्यवस्थापक, नेवासा)


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.