सोनई – दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि आपुलकीचा सण आहे. अशा सणानिमित्ताने सोनई-लोहोगाव रोड चौकातील आदिवासी व इतर समाजातील २० मजुर कुटुंबातील ५१ मुला-मुलींना नवे कपडे देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे कार्य माजी सभापती, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सुनिलराव गडाख यांच्या वतीने पार पडले.
सोमवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता हा उपक्रम राबविण्यात आला. या भागातील बहुतांश कुटुंबे मजुरी करून उपजिविका चालवतात. अलीकडील अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतमजुरांच्या रोजंदारीवर याचा परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर गडाख यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत दिवाळीच्या निमित्ताने शेतमजुरांच्या मुलांसाठी नवीन कपड्यांचे वाटप केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “सध्याच्या कठीण परिस्थितीत घरची आर्थिक अवस्था बेताची असल्याने अनेक मुले देखील आई-वडिलांसोबत कापूस वेचण्याच्या कामावर जात आहेत. दिवाळीला कपड्यांसाठी थोडे पैसे मिळतील या अपेक्षेने ही मुले काम करत असल्याची बाब समोर आली आणि त्यातूनच ही सामाजिक भावना आकारास आली.”

“कपडे मिळाल्यानंतर या निरागस मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हेच या उपक्रमाचे खरे यश आहे,” असेही गडाख यांनी नमूद केले.
या कार्यक्रमासह भ प गोरक्षनाथ महाराज गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बोरुडे, सखाराम राशिनकर, प्रभाकर गडाख, सुभाष राख, आप्पा महाराज निमसे, गणेशराव गडाख,दत्तात्रय भुसारी,संदीप लोंढे, गोविंद भुसारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.
सोनई परिसरातून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवाळी गोड झाली.
घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलांची दिवाळी कशी करायची हा प्रश्न होता सुनीलराव गडाख यांनी कपड्यांची भेट दिल्याने आमची व आमच्या मुलांची दिवाळी गोड झाली.
– भारत माळी,सोनई.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

