नेवासा – नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक, जळके खुर्द, परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दिवाळी होऊन आठवडा उलटला तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी मदतीचा एक रुपयाही जमा झालेला नाही, यामुळे गावामधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवरासंगम तालुक्यातील मंडळात सर्वाधिक अतिवृष्टी झाली होती. जळके बुद्रुक, जळके खुर्द, ही गावे प्रवरासंगम मंडळात येतात, परिसरातील शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाली. शेतात चिखल साचला, तर काहींचा संपूर्ण हंगामी खर्च पिकातच गाडला गेला. शासनाने तत्काळ पंचनामे करून मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात या गावांतील शेतकऱ्यांना आजपर्यंत एकाही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही.

शासनाचे अधिकारी पंचनाम्यासाठी आले, फोटो घेतले, कागदपत्रं भरली, पण त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही. इतक्या दिवसांत मदत मिळाली नाही, तर पुढे कधी मिळणार? आणि किती मिळणार? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी संघटनांनीही शासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासनं तर मिळतात, पण प्रत्यक्षात मदत वेळेवर दिली जात नाही, असा आरोप संघटनांनी केला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांसोबतच जनावरांचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले असून रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खत खरेदी करणेही कठीण बनले आहे. शासनाने तात्काळ मदत रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

 
                     
                    