नेवासा : आगामी नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून महाविकास आघाडीतील घटक पक्षांसमवेत स्थानिक आघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या संदर्भात नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरीचंद्र उर्फ अण्णासाहेब पटारे पाटील व जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अभिजीत लुणिया यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नैसर्गिक आघाडीनुसार नेवासा नगरपंचायत निवडणुकीत एकत्र लढण्याची तयारी करण्यात आलेली आहे. यासंदर्भात माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी चर्चाही झाल्याचे निवेदनात नमूद आहे. काँग्रेसने ५ ते ७ जागांची मागणी केली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे.

पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार भाजप व एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर इतर घटक पक्षांसोबत आघाडी करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षासोबत आघाडी केल्यास महाविकास आघाडीची ताकद वाढेल व विरोधकांना थोपवणे शक्य होईल, असेही निवेदनात नमूद आहे.
काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीचे नुकसान होऊन अप्रत्यक्षे नव्हे तर प्रत्यक्षरीत्या भाजप-शिवसेनेला मदतच होईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे नेवासा नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस-क्रांतिकारी शेतकरी पक्ष आघाडी तात्काळ अधिकृत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सचिन गुजर यांनाही देण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

