नगराध्यक्ष

उपनगराध्यक्ष गटाचा पत्रकार परिषदेत आरोप : ‘पाणीपट्टी माफ, घरपट्टी हाफ’ करण्यासाठी फुंकले रणशिंग

नेवासा (प्रतिनिधी) – संवैधानिक जबाबदारीच्या नगराध्यक्षपदावरील व्यक्तीकडून असंवैधानिक बेजबाबदार कारभाराचा श्रीगणेशा करण्यात आल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्षांसह त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याच्या बिकट बनलेल्या समस्येवर आग्रही भुमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींसह नागरिकांवर नगराध्यक्षांनी त्यांच्यातील सरंजामी मानसिकतेतून खोटे गुन्हे दाखल केल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

नेवासा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष गटांतील उभ्या संघर्षाने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले यांनी संवेदनशीलता दाखवून लवचिक भुमिका घेण्याची अपेक्षा असताना त्यांच्याकडून असंवेदनशीलपणे ताठर भुमिका घेण्यात येत असल्याचा सडेतोड आरोप उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे. नेवासा शहरातील बिकट बनलेल्या स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपनगराध्यक्षांनी त्यांच्या दालनात बोलावलेल्या बैठकीकडे संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाठ फिरविल्याने संतप्त बनलेल्या नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनात बसलेल्या जबाबदार अधिकाऱ्यास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता नगराध्यक्ष डॉ.घुले यांनी सरंजामी थाटात त्यांचा उपमर्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे नगराध्यक्षांच्या दालनाची नियमित साफसफाई केली जात असताना उपनगराध्यक्षांचे दालन अस्वच्छ ठेवण्याची विशेष खबरदारी घेतली जात असल्याच्या विरोधाभासाकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले. उपनगराध्यक्षांचे दालन अस्वच्छ असल्याने व ते स्वच्छ करण्यासाठी नगरपंचायतीचे कोणीही कर्मचारी सध्या उपस्थित नसल्याने ही बैठक नगराध्यक्षांच्या दालनात घेऊ देण्याची त्यांची मागणी नगराध्यक्ष डॉ.घुले यांनी सपशेल फेटाळून लावल्यानंतर दोन्ही गटात तात्विक शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरुन डॉ.घुले यांनी मोठा कांगावा करत राजकीय भुमिकेतून लोकप्रतिनिधी असलेल्या विरोधी नगरसेवकांसह काही ग्रामस्थांवर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हे दाखल करण्याची मर्दुमकी गाजवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गुन्हा नोंदविताना त्यांनी नगरसेवकांसह प्रतिष्ठीत ग्रामस्थांवर बेकायदेशीर जमाव जमवून गुंडगीरी केल्याच्या उल्लेखाचा यावेळी खरपूस भाषेत समाचार घेण्यात आला.

उपनगराध्यक्षांनी रितसर पूर्वसूचना देऊन बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित झालेल्या नगरसेवकांचा समुह बेकायदेशीर जमाव या संज्ञेत बसवून त्यांच्यावर गुंडगीरी केल्याची फौजदारी कलमे लादून नगराध्यक्षांनी त्यांची संकुचित राजकीय मानसिकता दाखवून दिल्याचे यावेळी क्रांतिकारीचे गटनेते व पाणीपुरवठा समितीचे सभापती जितेंद्र कुऱ्हे यांनी नमूद केले. मात्र अशा दबावतंत्राला भीक न घालता जनतेच्या प्रश्नावर आग्रही भुमिका कायम ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. नगरसेवक स्वप्नील मापारी यांनी यावेळी बोलताना जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविण्याची किंमत गुन्हे दाखल होण्याने मोजावी लागणार असेल तरी त्याची पर्वा न करता यापुढील काळातही लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक संभाजी धोत्रे, राजेंद्र काळे, आदी नगरसेवक उपस्थित होते.

सत्ताधाऱ्यांकडून दिली जाणारी सापत्न वागणूक जोपर्यंत थांबत नाही, स्वच्छता व पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपनगराध्यक्षा व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी पटांगणात थाटलेल्या मंडपातील कार्यालयातून कारभार हाकण्यास सुरुवात केली असून शहरवासियांना पंधरा दिवसांतून एकदा तोही अस्वच्छ तसेच अपूरा पाणीपुरवठा केला जात असताना नगरपंचायत प्रशासन त्यांच्यावर लादत असलेली पाणीपट्टी अन्यायकारक असून नियमित घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांनाही पायाभूत सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत असल्याने शहरवासियांची पाणीपट्टी माफ तर घरपट्टी हाफ (अर्धी) करण्याची आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

गुंड कोण?
उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित महिला-पुरुष नगरसेवकांवर बेकायदेशीर जमाव जमवून गुंडगीरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यासाठी पणाला लावलेली राजकीय शक्ती शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नगराध्यक्षांनी खर्च केली असती तर आम्ही राजकीय भेद विसरुन त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढली असती. ज्यांच्यावर सनदू अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे त्यांच्याकडून लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांवर गुंडगीरीचे आरोप व्हावेत, हेच मुळी हास्यास्पद आहे. – संजय सुखदान, नेते, आम आदमी पार्टी.

उच्च न्यायालयात आव्हान देणार –
उपनगराध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीला बेकायदेशीर जमाव संबोधून त्यांच्यावर गुंडगीरीचे खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान देणार आहोत. – अॅड.सादिक शिलेदार, तालुकाध्यक्ष, आम आदमी पार्टी

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नगराध्यक्ष
नगराध्यक्ष

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नगराध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!