काल्याच्या दहिहंडीला भाविकांची गर्दी, रेवड्यांची उधळण
नेवासा-नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता रेवड्यांची उधळण करीत काल्याची दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी काल्याचा प्रसादासाठी हजारो भाविकांनी मंदिर प्रांगणात गर्दी केली होती. यात्रोत्सवात लाखो भाविकांनी भगवान विष्णूंच्या स्त्रीरूप मोहिनी अवताराचे दर्शन घेतले.
श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवाला रथसप्तमीपासून प्रारंभ झाला. सप्ताहात भागवत कथा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. त्यानंतर माघ पौर्णिमेला भळंदचा कार्यक्रम होऊन श्री मोहिनीराजांच्या उत्सवमूर्ती समोर महाप्रसादाच्या पंगती बसल्या. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.श्री मोहिनीराजांच्या यात्रोत्सवात देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी
महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत उद्धव महाराज मंडलिक, वेदांताचार्य देवीदास महाराज म्हस्के, महंत रमेशानंदगिरी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी येथे भेट देऊन उत्सवमूर्ती मोहिनीराजांचे दर्शन घेतले.

शुक्रवारी (दि.६) यात्रेच्या मुख्य दिवशी श्री मोहिनीराज मंगल कार्यालयामध्ये दुपारी उत्सवमूर्ती समोर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजता पाकशाळेत जिल्हा न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. येथूनच उत्सव मूर्तीच्या पालखी मिरवणुकीला प्रारंभ झाला.
पालखीचे श्री मोहिनीराजांच्या मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी टाळ-मृदंग व सनई चौघडयाचा गजर करीत आलेल्या पालखी मिरवणुकीचे सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले.सायंकाळी ६ वाजता पालखीचे आगमन श्री मोहिनीराजांच्या मंदिर प्रांगणात झाल्यानंतर येथे रेवड्यांची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाटील घराण्यातील मानाप्रमाणे बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल्याची दहिहंडी फोडण्यात
आली. यावेळी उधळलेल्या रेवड्या झेलण्यासाठी व काला घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. देशपांडे गल्लीमध्ये तर घरोघरी काल्याचे वाटप करण्यात आले.
यात्रेनिमित्त नेवासा शहरात विविध संघटना व संस्थेच्या वतीने चौकाचौकात स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता
मंदिर परिसरात घरोघरी काला!
यावेळी उधळलेल्या रेवड्या झेलण्यासाठी व काला घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात घरोघरी काल्याचे वाटप करण्यात आले. काल्याचा प्रसाद घेण्यासाठी श्री मोहिनीराज मंदिर प्रांगण गर्दीने फुलून गेले होते. मुख्य पेठेत ही यात्रेमुळे मोठी गर्दी झाली होती.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

