तिघे गंभीर जखमी। खंडाळ्याजवळील घटना
आपला जिल्हा : श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावरील खंडाळा गावानजीक काल बुधवारी दुपारी ४च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात श्रीरामपूर येथील बस स्टँड समोरील संतोषी वडापाव या दुकानाच्या चालकांच्या कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक महिला व दोन लहान मुले गंभीर जखमी असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४च्या सुमारास श्रीरामपूरहून संगमनेर रस्त्याने नाशिककडे काही कामानिमित्त संतोषी वडापावचे संचालक व त्यांच्या कुटुंबातील मिळून ७ सदस्य एमएच ३ एएफ ००५४ या स्विफ्ट डिझायर गाडीतून जात होते. खंडाळा नजीक समोरून येणाऱ्या एचआर ६७ ई ३००२ क्रमांकाच्या कंटेनरला या गाडीची जोराची धडक बसली. या धडकेत स्विफ्ट गाडीतील चालक प्रशांत रमेश चव्हाण (वय२४), ऐश्वर्या अशोक चव्हाण (वय २६) व सिद्धार्थ सुनील चव्हाण (वय १५) हे तिघे घटनास्थळी जागीच ठार झाले.

अपघात घडताच स्थानिकांनी जखमींना त्वरित साखर कामगार हॉस्पिटल, श्रीरामपूर येथे हलविले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी व स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धावून अपघातग्रस्त गाडीतील संगीता चव्हाण (वय ४०) व सारिका चव्हाण (वय ३०) या दोन जखमी महिलांना अॅम्ब्युलन्समध्ये श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले; मात्र या महिलांना देखील लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर संगीता चव्हाण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात रुद्र अशोक चव्हाण (वय ६), ऋत्वी अशोक चव्हाण (वय ३) हेही जखमी झाले आहेत. श्रीरामपूर-संगमनेर रस्त्यावर खंडाळा येथील त्रिमूर्ती नर्सरी नजीक झालेला अपघात इतका भयानक होता की, स्विफ्ट गाडी धडकेमुळे १५ ते २० फूट मागे सरकली गेली. अपघातात कारची पुढील बाजू अर्ध्यापर्यंत आत घुसली होती व चालक त्यात अडकून जागीच ठार झाला होता. गाडीतील इतर सदस्यदेखील गंभीर जखमी झाले होते. अपघात घडल्यानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. जखमींना बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व पोलिसांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.

हा अपघात कशामुळे व कसा झाला, याबाबत सविस्तर माहिती मिळाली नसून समोरून येणारा कंटेनर त्याच्या बाजूने असताना स्विफ्ट कार विरुद्ध दिशेने अपघातग्रस्त अवस्थेत होती. घटनास्थळी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, हेड कॉन्स्टेबल किशोर औताडे यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी हजर होते. या भागात सुसाट वाहतूक असून योग्य त्या उपाययोजना करण्याची व वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे. अपघात झाल्यावर काही वेळात नातेवाईक घटनास्थळी येताच त्यांनी मोठा आक्रोश केला. या अपघातात ग्रस्त झालेली स्विफ्ट गाडी चव्हाण कुटुंबाने ४ ते ५ दिवसांपूर्वी खरेदी केली होती व त्यातून ते देवदर्शनाला चालले होते, असे या ठिकाणी बोलले जात होते.

चौकट-हसते-खेळते कुटुंब उद्ध्वस्त
श्रीरामपूर येथील प्रसिद्ध ‘संतोषी वडापाव’ व्यवसायाशी संबंधित चव्हाण कुटुंब अवघ्या काही दिवसांपूर्वी घेतलेल्या नवीन कारने देवदर्शनासाठी निघाले होते. मात्र, खंडाळ्याजवळ झालेल्या या काळाच्या घाताने कुटुंबातील ४ सदस्यांचा अंत झाला. अपघाताची भीषणता इतकी होती की कारचा चेंदामेंदा झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

