सोनई-श्रीशनिशिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या अॅप घोटाळा प्रकरणी ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करावी, यासाठी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन प्रभाकर दरंदले यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याबाबत दि. ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानमधील अॅप घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक
संघटनांनी आवाज उठविला होता. यानंतर नेवासाचे आ. विठ्ठलराव लंघे व आष्टीचे आ. सुरेश धस यांनी मागच्या वर्षी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडली. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर विभागामार्फत तपास करण्याचे आदेश दिले होते. यानंतर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर पोलिसांकडून देवस्थान कर्मचाऱ्यांविरोधात ऑनलाईन पूजेचे पैसे स्वतःच्या खात्यात वळविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली. यानंतर कोर्टात देवस्थान कर्मचारी व अॅप मालक अशा ७ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आता याप्रकरणी सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते दरंदले यांनी या अॅप घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी व सीबीआयमार्फत करण्यात यावा, यासाठी आधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रोसिजरप्रमाणे पहिली उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी व तिथे न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात यावे असा आदेश करून याचिका निकाली काढली. त्यानंतर दरंदले यांनी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली असून याचिकेवर आता ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

त्यांनी याचिकेमध्ये, श्री शनैश्वर देवस्थानमधील अॅप घोटाळ्याचे ईडी व सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, मागील दिवसात झालेल्या पावती घोटाळा, क्यूआर कोड घोटाळा, बोगस देणगी घोटाळा, अतिरिक्त कर्मचारी भरती घोटाळा इत्यादीचे चौकशीची मागणी केली आहे. मागील पंधरा वर्षाचे श्री शनैश्वर देवस्थानचे पूर्ण ऑडिट केंद्रीय ऑडिटर व माजी न्यायाधीश यांच्या समितीमार्फत करण्यात यावे, अशा मागण्या याचिकेमध्ये केलेल्या आहेत. आता ३० मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

