वीजमीटरची छेडछाड; हॉटेलमालकांवर गुन्हा दाखल; घटनास्थळाचा वीजपुरवठा खंडीत
नेवासा-तालुक्यातील भेंडा व कुकाणा हद्दीत महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत वीजमिटरच्या मागील बाजूस छेडछाड करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. वीज मीटरच्या आतील बाजूची लाल रंगाची वायर कट करण्यात आलेली आढळली. याप्रकरणी संबधित हॉटेलमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर सुमारे १८ लाख ६२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
भरारी पथकाने घटनास्थळी असलेले वीजमीटर पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले व घटनास्थळचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. फिर्यादी प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियता, महावितरण राजेंद्र बाळ शिर्के यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फिर्यादी शिर्के यांनी म्हटले, दि.११ डिसेंबर २०२५ रोजी पथकातील सहकारी व पंचांसोबत वीजचोरी तपासणी करण्यासाठी चिलेखानवाडी, नेवासा, येथे घटनास्थळी पाहणी केली. तेथील हॉटेलचे मालक (हॉटेल यशराज)
विज वापरदार राहुल भाऊसाहेब जावळे यांना वीजबिलाची मागणी करून वीजपुरवठा तपासणीसाठी सुरुवात केली असता, त्यांनी वीजबिल सादर केले. घटनास्थळी वीजवापरदार आणि पंच यांच्यासमक्ष वीजमीटर तपासले असता, वीजमीटरला छेडछाड
आढळली. ते ताब्यात घेण्यात आले. त्यांनी महावितरणची फसवणूक करून मागील १२ महिन्यात ४९ हजार ५४३ युनिटची चोरी करून वीज आकार बिल व तडजोड आकार बिल असे एकूण मिळून रुपये १२ लाख ६१ हजार ७७० रुपयांची वीजचोरी केली. त्यांच्याविरूद्ध विद्युत कायदा २००३, कलम १३५ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

तसेच भेंडा येथील हॉटेल स्वागत येथेही वीजमिटरची तपासणी करण्यात आली. यावेळी हॉटेलमालक गणेश कारभारी गव्हाणे यांनी महावितरणच्या विजेच्या खांबावरून थेट वीजपुरवठा घेऊन विजेची उपकरणे चालू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गवाणे यांच्याविरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांनी मागील वर्षभरात सुमारे ६ लाख रुपयांच्या २३ हजार ६०० युनिटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, भरारी पथकाने घटनास्थळी असलेले वीजमीटर पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले व घटनास्थळचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

