नेवासा- ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेवासे येथे जिल्हास्तरीय ग्राहक दिनात अधिकारी वर्गानेच पाठ फिरविल्यामुळे या बैठकीला एकही अधिकारी उपस्थित राहिला नाही. ग्राहक संरक्षण परिषदेतील अशासकीय सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नेवासे येथे रविवारी (दि.१५) जागतिक ग्राहक दिनाच्यानिमित्ताने कार्यक्रमास नेवासे तहसीलदार व त्यांचे कर्मचारी वगळता इतर कोणीही अधिकारी या बैठकीला नव्हते. वास्तविक पाहता पंधरा दिवस आधीच ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक संयुक्त बैठक घेऊन नियोजन करणे आवश्यक होते. यापूर्वी बैठका घेऊनच कार्यक्रमाचे नियोजन केले जात होते. परंतु सध्या गेल्या दोन-तीन वर्षापासून अशी बैठक न घेता अचानकपणे कार्यक्रम जाहीर करणे आणि कुठल्याही सदस्याला किंवा संघटनेला विश्वासात न घेता कार्यक्रमाचे नियोजन केले जात असल्यामुळेच ग्राहक दिनाचा फज्जा उडाल्याचा आरोप ग्राहक संरक्षण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

ग्राहक दिन कार्यक्रमास विविध खात्यातील अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या
पत्राला अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखविली असल्याचा रोष आणि आरोप संघटनेतून व्यक्त केला जात आहे. वीज वितरण, कृषी, आरोग्य, एस.टी. महामंडळ, महसूल, बँक, भूमी अभिलेख, पेट्रोल पंप चालक इत्यादी याबाबत ग्राहकांच्या नेहमी तक्रारी असतात परंतु कार्यालयीन प्रमुख अधिकारीच या बैठकीला गैरहजर राहिलेले असल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण होऊ शकलेले नसल्याने ग्राहक संरक्षण परिषदेने नाराजी व्यक्त केली आहे.

ग्राहक संरक्षण परिषदेची अशासकीय सदस्यांची बैठक दर महिन्याला घेण्याचे ठरलेले असताना सुद्धा विविध कारणे सांगून बैठका पुढे ढकलल्या जात आहे. शासकीय सदस्यांच्या बैठकीला कुठल्या प्रकारची आचारसंहिता नसते, तरी सुद्धा वेगवेगळे अन्य कारणे सांगून ग्राहकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेली अशासकीय सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीत ग्राहकांचे प्रश्न सोडवले जातात मात्र या बैठकीत अधिकारी आणि दुकानदार आणि इतर कुठलेच लोक उपस्थित नसल्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रश्न मार्गी लागत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेली अशासकीय सदस्यांच्या बैठकीला वेळ आणि महत्व दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला.
ठरलेल्या वेळी बैठक घेणे गरजेचे असताना मात्र अलीकडे तसे न होत नसल्यामुळे याबद्दल परिषदेने खंत व्यक्त केली. लवकरच या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करून जिल्ह्यातील ग्राहकांच्या प्रश्नाबद्दल असलेली उदासीनता वरिष्ठाच्या लक्षात आणून दिली जाईल, असेही ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी सांगितले.

यावेळी मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष विलास जगदाळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी, प्रांताचे सदस्य अतुल कुऱ्हाडे, सचिव दिनेश थोरात, महिला अध्यक्ष अमिता कोहली, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, परिषदेचे सदस्य अशोक शेवाळे, उमा मेहत्रे, डॉ. रजनीकांत पुंड, रामकृष्ण थोटे आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

