करोडो रुपये लंपास करणाऱ्यांना मोकळे रान : शनैश्वर देवस्थान प्रशासनाचा अजब कारभार
नेवासा – भाविकाने स्वखुशीने दिलेल्या अवघ्या वीस रुपयांचे बक्षीस स्विकारल्याबद्दल एका सुरक्षा रक्षकाविरोधात गेल्या दहा वर्षांपासून लाखो रुपयांचा खर्च करुन न्यायालयात खटला लढविणारे शनैश्वर देवस्थानचे कर्तव्यदक्ष (?) प्रशासन करोडो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या ‘गँग्स ऑफ शिंगणापूर’ पुढे हतबल कसे, याची उलटसुलट चर्चा शनिशिंगणापूर परिसरात रंगली आहे.
भाविकांची नियमित मोठी मांदियाळी असताना गेल्या काही वर्षांत शनैश्वर देवस्थानची दानपेटी तशा अर्थाने रिकामीच रहात असल्याचे गमक बनावट अॅप, बनावट क्यू आर, बनावट देणगी पावती पुस्तकांच्या देवस्थान परिसरातील खुलेआम रेलचेलमुळे ग्रामस्थांना उलगडले आहे.

यानिमित्ताने देवस्थान प्रशासनाच्या कर्तव्यदक्ष (?) कारभाराचे असंख्य किस्से सांगितले जाऊ लागले आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी देवस्थानच्या एका सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याने भाविकाच्या एका कुटुंबास दर्शनासाठी मदत व मार्गदर्शन केल्यामुळे त्या भाविकाने त्याला खुश होऊन 20 रुपये बक्षीस म्हणून देऊ केले. सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याने अवघडून जात ही बक्षीसाची रक्कम स्विकारण्यास नकार देऊनही त्या भाविकाने ते 20 रुपये त्या कर्मचाऱ्याच्या खिशात बळजबरीने कोंबले. मात्र हा भयंकर (?) प्रकार देवस्थानच्या सीसीटीव्हीत स्पष्ट दिसल्याने देवस्थानचे कर्तव्यकठोर प्रशासन प्रचंड अस्वस्थ बनले. सदर कर्मचाऱ्याच्या भाविकाकडून 20 रुपयांची बक्षीसी स्विकारण्याने देवस्थानची इभ्रत धूळीस मिळून जगभरात मोठी नाचक्की झाल्याचे आकांडतांडव त्यावेळी करण्यात आल्याच्या प्रकारास ग्रामस्थांनी उजाळा दिला आहे. या 20 रुपयांची बक्षीसी घेणाऱ्या कर्मचाऱ्याला देवस्थान प्रशासनाने न्यायालयात खेचून गेल्या दहा वर्षांत या खटल्यावर लाखो रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.

भाविकाने स्वखुशीने दिलेली 20 रुपयांच्या बक्षीसाची रक्कम स्विकारणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या विरोधात एवढे मोठे कायदेशीर मार्गाचे पाऊल उचलणारे शनैश्वर देवस्थान प्रशासन भाविकांची तसेच देवस्थानची दिशाभूल व फसवणूक करुन बनावट अॅप, क्यू आर, देणगी पावती पुस्तकांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा गफला करुन देवस्थानचा महसूल रोडावणाऱ्या अट्टल बदमाशांच्या ‘गँग्स ऑफ शिंगणापूर’ विरोधात स्वतःहून ईडी, सीबीआय, सीआयडी आदी उच्चस्तरिय सखोल चौकशीच्या मागणीसह अन्य कठोर कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याची उत्सुकता ग्रामस्थांसह देवस्थानातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना लागून राहिली होती.
मात्र दुर्दैवाने इतका मोठा गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्याला पंधरा दिवसांवर कालावधी उलटून जाऊनही शनैश्वर देवस्थान प्रशासनात ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई’ अशा प्रकारचे वातावरण दिसून येत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.