अहिल्यानगर | सचिन कुरुंद – जिल्ह्यात अवैध जुगार व सट्टा व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांनी विशेष पोलीस पथक स्थापन करून कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष आ. खाडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ०१ जुलै २०२५ रोजी कोपरगाव तालुका व शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार मटका अड्ड्यांवर एकाच दिवशी छापा टाकण्यात आला. ही कारवाई जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील महत्त्वपूर्ण मोहीम ठरली आहे.

पहिली कारवाई कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खिर्डी गणेश शिवारात करण्यात आली. विशेष पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, साईटेक हॉटेलच्या मागे कांद्याच्या चाळीत काही इसम आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका जुगाराची बुकींग घेत आहेत. सदर माहितीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना बोलावून घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांच्या आगमनाची चाहूल लागताच तीन ते चार इसम पळून गेले, मात्र आत शेडमध्ये १९ इसम मिळून आले. चौकशीदरम्यान रविंद्र माधव सानप रा. टाकळी हा मुख्य बुकी असल्याचे समजले. तो फरार झाला असून, त्याचा भाऊ बबलू माधव सानप व इतर साथीदार प्रविण डोखे, जनार्धन खरसे, जितेंद्र पहिलवान यांच्या मदतीने हा जुगार चालवला जात होता. अटक करण्यात आलेल्या इसमांकडून ५०,२३० रुपये रोख, १४ मोबाईल (१,२४,००० रुपये किंमत), आणि १२ वाहने (९,०५,००० रुपये किंमत) असा एकूण १०,७९,२३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २००/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जेऊर पाटोदा शिवारात करण्यात आली. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रविंद्र कारभारी ढोक यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम कल्याण मटका नावाचा हारजितीचा जुगार खेळवतात. या ठिकाणीही छापा टाकण्यात आला असता, ६ इसमांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीमध्ये ७०,४५० रुपये रोख, ५ मोबाईल (५४,००० रुपये किंमत), आणि ३ वाहने (१,६०,००० रुपये किंमत) असा २,८४,४५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३५१/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये २५ इसमांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, एकूण १३,६३,६८० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुवमें (श्रीरामपूर विभाग), व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. वमने (शिडी) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष खाडे यांनी केले. त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक/पोसई राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार शकील शेख, पोलीस हवालदार शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, अक्षय भोसले, जालिंदर दहिफळे, दिपक जायव, आणि विजय ढाकणे हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून ही मोठी आणि नियोजित कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, जिल्ह्यातील अशा अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून मिळाला आहे. भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्रतेने राबविल्या जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.