सध्या इन्कम टॅक्स रिटर्न (प्राप्तिकर परतावा) दाखल केला जातो आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठीचा (2024-25) रिटर्न दाखल करण्याची किंवा भरण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे.
आता 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर, 2025 असणार आहे. यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
यापुढे 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर नोकरदारांना कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही. तर इतर करदात्यांसाठी 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे.
या नव्या तरतुदीमुळे अनेकजणांमध्ये यावर्षाच्या इन्कम टॅक्स रिटर्नबाबत गोंधळ आणि गैरसमज आहेत.
पॅन कार्ड आणि इन्कम टॅक्स रिटर्न यासंदर्भात भारतात, सर्वसामान्य करदात्यांमध्ये आधीच अनेक गैरसमज आहेत. उदाहरणार्थ, इन्कम टॅक्स रिटर्न कोणी भरावा, भरण्यासाठी किती वार्षिक उत्पन्नं असलं पाहिजे, जर भरला नाही तर काय होतं, इत्यादी.
इन्कम टॅक्स रिटर्न आणि पॅन कार्डसंदर्भातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत, बीबीसीनं चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि करतज्ज्ञ करीम लखानी यांच्याकडून जाणून घेतलं.

कोणासाठी बंधनकारक असतं?
करीम लखानी म्हणाले की जर तुमचं एकूण उत्पन्न, मूळ करमुक्त उत्पनाच्या मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला पाहिजे.
म्हणजेच,
- जर एखाद्या सर्वसामान्य करदात्याचं (60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या) वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल
- जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं (60 ते 80 वर्षे वयाच्या) वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल
- जर सुपर ज्येष्ठ नागरिकांचं (80 वर्षांपेक्षा अधिक) वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल
तर त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे.
अशा परिस्थितीत, जर एकूण वार्षिक उत्पन्न (कलम 80 अंतर्गत असणारी कपात करण्यापूर्वी) वर दिलेल्या करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा अधिक असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावाच लागेल.
त्याचबरोबर, प्रत्येक कंपनी आणि फर्मला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. मग त्या कंपनीला किंवा फर्मला नफा झालेला असो की तोटा.
- त्याचप्रमाणे, तुम्ही रिफंड किंवा परताव्यासाठीचा दावा करू शकता.
- तुम्हाला कोणतंही नुकसान पुढील वर्षी पुढे दाखवायचं असल्यास.
- धार्मिक किंवा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत तुमची भारतात कोणतीही मालमत्ता असल्यास.
- तुम्ही एक राजकीय पक्ष आहात का?
- तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि तुमची भारताबाहेर मालमत्ता किंवा आर्थिक हितसंबंध असल्यास (अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा रहिवासी मात्र सामान्य रहिवासी नसलेल्या (आरएनओआर))
- जर तुम्ही भारताचे रहिवासी असाल आणि भारताबाहेर असलेल्या खात्यावर सही करण्याचा तुम्हाला अधिकार असेल (अनिवासी भारतीय (एनआरआय) किंवा रहिवासी मात्र सामान्य रहिवासी नसलेल्या (आरएनओआर) यांना लागू होत नाही) तर, तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.

याशिवाय, जर तुमचं उत्पन्न करमुक्त उत्पनाच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असेल, मात्र
- तुम्ही एक किंवा अधिक चालू खात्यांमध्ये (करंट अकाउंट) 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली असल्यास.
- तुम्ही बचत खात्यात (सेव्हिंग्ज अकाउंट) 50 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केलेली असल्यास.
- तुम्ही स्वत:साठी किंवा इतर कोणासाठी, परदेश ट्रिप किंवा सहलीवर दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च केलेली असल्यास.
- तुमचं वार्षिक वीज बिल एक लाख रुपयांहून अधिक असल्यास.
- तुमचा टीडीएस किंवा टीसीएस (टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स) 25,000 रुपयांहून (ज्येष्ठ नागरिकांसाठी 50,000 रुपये) अधिक असल्यास.
- तुमच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 60 लाख रुपयांहून अधिक असल्यास.
- तुमचं व्यावसायिक उत्पन्न 10 लाख रुपयांहून अधिक असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल न केल्यास किती दंड?
सीए करीम लखानी म्हणतात की, ज्या करदात्यांच्या किंवा फर्मच्या खात्यांचं ऑडिट करण्याची आवश्यकता नाही, अशांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत साधारणपणे, 31 जुलै असते.
- वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल आणि जर इन्कम टॅक्स रिटर्न अंतिम मुदतीनंतर दाखल केला असेल, तर 5,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.
- एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न अंतिम मुदतीनंतर दाखल केला असेल, तर 1,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.
- जर तुमचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असेल, तर कोणताही दंड आकारला जात नाही.

मात्र जर बँक खात्यात 1 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली असेल किंवा परदेश ट्रिपवर 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली असेल, तर उशिरा इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास दंड आकारला जाऊ शकतो.
- जर तुमचा इन्कम टॅक्स थकित असेल आणि इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरला नाही, तर थकित रकमेवर दरमहा एक टक्का साधं व्याज आकारलं जाईल.
- याशिवाय, तुम्हाला नुकसान किंवा तोटा पुढच्या वर्षी दाखवता येणार नाही.
- तुम्हाला व्यवसायात किंवा भांडवली तोटा झाला असल्यास आणि तुम्ही वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाही, तर तुम्ही पुढील वर्षाच्या उत्पन्नामध्ये तुमचं नुकसान दाखवू शकत नाही.
- इन्कम टॅक्स रिटर्न वेळेवर भरून, तुम्ही तुमचं नुकसान किंवा तोटा पुढील वर्षी दाखवू शकता, ज्यामुळे भविष्यातील तुमच्यावरील कराचा बोझा कमी होऊ शकतो.
- याशिवाय, जर तुम्ही अधिक कर भरला असेल आणि रिफंड किंवा परताव्यास पात्र असाल, तर अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स रिटर्न उशिरा भरल्यास, तुम्हाला रिफंड किंवा परतावा मिळण्यास उशीर होऊ शकतो.
- गंभीर प्रकरणांमध्ये, प्राप्तिकर विभाग कायदेशीर कारवाई करू शकतं. जर कर 25,000 रुपयांहून अधिक असेल, तर अशा प्रकरणात सहा महिने ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
- इतर प्रकरणांमध्ये, तीन महिने ते दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंड आकारला जाऊ शकतो.
माझ्याकडे पॅन कार्ड असेल, तर मला प्राप्तिकर परतावा भरावा लागेल का?
तुमच्याकडे पॅन कार्ड आहे म्हणून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक नाही. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं हे तुमचं एकूण उत्पन्न आणि इतर काही घटकांवर अवलंबून आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, जर तुम्ही तुमच्या चालू खात्यात एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली असेल, जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात 50 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा केली असेल आणि जर तुम्ही परदेशातील ट्रिपसाठी दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागेल.

एकदा इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास सुरुवात केली, तर तो दरवर्षी भरावाच लागतो का?
करीम लखानी म्हणतात, “जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास सुरुवात केली, तर तो दरवर्षी भरणं आवश्यक नाही. जोपर्यंत तुम्ही त्या वर्षाच्या प्राप्तिकराच्या नियमांनुसार इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास पात्र नसता तोपर्यंत तो दाखल करणं आवश्यक नाही.”
“याचा अर्थ, जर त्या वर्षातील एकूण उत्पन्न मूळ करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल आणि इतर कोणत्याही अटी लागू होत नसतील, तर त्या वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.”
ते पुढे म्हणतात, “उदाहरणार्थ, जर तुम्ही 2023-24 या मूल्यांकन वर्षामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला असेल, मात्र तुमचं उत्पन्न तीन लाख रुपये असेल, परंतु 2024-25 या मूल्यांकन वर्षात तुमचं उत्पन्न घटून दोन लाख रुपये झालं आणि इन्कम टॅक्स रिटर्न बंधनकारक करणारी कोणतीही अट तुम्हाला लागू होत नसल्यास, त्या वर्षासाठी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं बंधनकारक नाही.”
(मूल्यांकन वर्ष म्हणजे ज्या वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला जातो ते वर्ष. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या पुढील वर्ष.)
मात्र करीम लखानी सल्ला देतात की, इन्कम टॅक्स रिटर्न नियमित भरणं योग्य ठरतं. यामुळे आर्थिक शिस्त राखली जाते आणि भविष्यात कर्ज मिळणं सोपं होतं.
याव्यतिरिक्त, जर तुमचा टीडीएस कापला गेला असेल आणि तुमचं एकूण उत्पन्न करपात्र नसेल, तर तो परतावा म्हणजे कापला गेलेल्या टीडीएसचा रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.
एकदा का हा रिफंड किंवा परतावा परत मिळवण्यासाठी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यास सुरुवात केली, की टीडीएस रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.
त्याप्रमाणे, तुमच्या व्यवसायातील तोट्याची भविष्यातील उत्पन्न किंवा नफ्याशी जुळवणूक करण्यासाठी किंवा भविष्यात तो तोटा अंतर्भूत करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल. तुमचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असलं तरीदेखील इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.
जर एखाद्या व्यक्तीनं एखाद्या वर्षी कमी उत्पन्नामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर त्याला तो पुढील वर्षी दाखल करता येतो.
एखादा करदाता निवृत्त झाला किंवा त्यानं काम करणं थांबवलं, तरीही त्याला इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावाच लागेल का?
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचं बंधन निव्वळ सेवानिवृत्त झालं आहे किंवा काम थांबवलं आहे म्हणून संपत नाही.
सेवानिवृत्तीनंतर किंवा अगदी तुम्ही काम करणं थांबवलं असेल, तरी तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरावा की नाही हे काही गोष्टींवर अवलंबून असतं.
- उत्पन्न: निवृत्तीनंतर तुमच्या उत्पन्नाचं स्त्रोत किंवा साधनं काय आहेत? तुम्हाला पेन्शन मिळतं का? बँकेतून मिळणारं व्याज, भाडे उत्पन्न, शेअर बाजारातून मिळणारं उत्पन्न, इत्यादी सारखं इतर उत्पन्न आहे का? जर या सर्व उत्पन्नांमधून मिळणारं एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर मग तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भराला लागेल.
- पेन्शन: निवृत्तीनंतर मिळणारं पेन्शन देखील उत्पन्नच मानलं जातं आणि त्यावर प्राप्तिकर लागू होतो. जर पेन्शनद्वारे मिळणारं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा अधिक अशेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल.
- बँकेतील व्यवहार: जर निवृत्तीनंतर बँक खात्यात मोठ्या रकमेचे व्यवहार असतील, उदाहरणार्थ एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा केली जात असेल किंवा दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम परदेशी ट्रिपवर खर्च केली जात असेल, तर करदात्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागेल. जरी त्याचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असलं तरीदेखील इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागेल.
- टॅक्स रिफंड क्लेम: जर निवृत्तीपूर्वी पगारातून अधिक टीडीएस वजा केला गेला असेल आणि तुम्हाला तो रिफंड मिळवायचा असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागेल.
जर निवृत्त व्यक्तीचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल आणि त्याला इतर कोणत्याही अटी लागू होत नसतील, तर इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणं त्या व्यक्तीसाठी बंधनकारक नाही. मात्र रिफंड मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी स्वेच्छेनं इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करता येतो.

इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याचे काय फायदे आहेत?
प्राप्तिकर तज्ज्ञ, नियमितपणे आणि अंतिम मुदतीच्या आत इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा सल्ला देतात. यामागं अनेक कारणं आहेत,
- इन्कम टॅक्स रिटर्न हा तुमच्या उत्पन्नाचा अधिकृत पुरावा आहे. तो सर्व प्रकारची कर्ज, क्रेडिट कार्डसाठीची अर्ज किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी उपयुक्त असतो. बँक आणि वित्तीय संस्था गेल्या काही वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न मागतात.
- परदेशात प्रवास करण्यासाठी व्हिसासाठी अर्ज करताना, अनेक देशांचे दूतावास गेल्या काही वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न मागतात. तो तुमच्या आर्थिक स्थैर्याचा आणि उत्पन्नाचा पुरावा असतो. त्यामुळे तुम्हाला व्हिसा मिळण्याची शक्यता वाढते.
- टॅक्स रिफंडसाठी, तोटा पुढील वर्षात दाखवण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न आवश्यक असतो.
- अगदी सरकारी निविदा आणि इतर कामांसाठी अर्ज करताना सुद्धा, गेल्या काही वर्षांचा इन्कम टॅक्स रिटर्न सादर करावा लागतो.
- याव्यतिरिक्त, इन्कम टॅक्स रिटर्न हा तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील मानला जातो.
- काही मोठ्या विमा पॉलिसी काढताना, विमा कंपन्या इन्कम टॅक्स रिटर्नची मागणी करू शकतात.
नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न न भरण्याचे काय तोटे आहेत?
नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे काही फायदे आहेत, तसेच न भरण्याचे तोटेदेखील आहेत. ते पुढीलप्रमाणे,
- प्राप्तिकर नियमांनुसार, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी पात्र असाल, मात्र तो वेळेवर भरला नाही, तर तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो आणि थकीत करावर तुम्हाला व्याज भरावं लागू शकतं.
- जर तुम्हाला व्यवसायात किंवा भांडवली तोटा झाला असेल, मात्र तुम्ही वेळेवर इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाहीत, तर तो तोटा तुम्ही पुढील वर्षी दाखवू शकत नाही. रिअल इस्टेटमधील तोटा यातून वगळण्यात आला आहे.
- जर तुम्ही खूप जास्त कर भरला असेल आणि आता रिफंड मिळवू पाहत असाल, मात्र इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर रिफंड मिळण्यास विलंब होईल.
- जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत नसाल तर बँक आणि वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यास टाळतात किंवा विचार करतात.
- अनेक देशांमध्ये व्हिसा अर्जाबरोबर इन्कम टॅक्स रिटर्न सादर करणं बंधनकारक आहे. त्याशिवाय व्हिसा मिळणं कठीण होतं.
- गंभीर प्रकरणांमध्ये, जर जाणूनबुजून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
- जे लोक नियमितपणे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करत नाहीत, त्यांची वित्तीय विश्वासार्हता कमी लेखली जाते.
- या कारणांमुळे जरी तुमचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असलं तरीदेखील इन्कम टॅक्स रिटर्न भरणं काहीजणांसाठी फायद्याचं ठरू शकतं.
इन्कम टॅक्स रिटर्न आणि पॅनकार्डबद्दलचे गैरसमज
भारतातील करदात्यांमध्ये इन्कम टॅक्स रिटर्न आणि पॅन कार्ड याबाबत अनेक गैरसमज आहेत. सीए करीम लखानी यांनी यातील काही गैरसमजांबद्दल माहिती दिली.
गैरसमज: जर कंपनीनं टीडीएस कापला असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
सत्य: जर तुमचं एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा अधिक असेल, तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. अगदी तुमचा टीडीएस कापला गेला असेल तरी.
गैरसमज: माझं उत्पन्नं करपात्र नाही. मग मी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
सत्य: जर तुमचं उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मूळ मर्यादेपेक्षा कमी असेल, तर सर्वसाधारणपणे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नसते. मात्र वर नमूद केल्याप्रमाणे, जर तुमच्या बँक खात्यातील व्यवहार, परदेश प्रवास इत्यादी मोठे खर्च असतील, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक असतं.
गैरसमज: फक्त नोकरदारांनीच इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक असतं.
सत्य: ज्यांचं एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक आहे. मग त्यांचा स्वयंरोजगार असो, ते फ्रीलान्सर असोत की त्यांचा व्यवसाय असो.
गैरसमज: इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे खूप गुंतागुंतीचं आणि वेळखाऊ काम आहे.
सत्य: इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन आहे आणि खूपच सोपी झाली आहे. जर तुमचं उत्पन्न माफक किंवा कमी असेल तर तुम्ही स्वत:देखील इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करू शकता. जर आवश्यकता असेल, तर तुम्ही याच्याशी संबंधित व्यावसायिकांची मदत घेऊ शकता.
गैरसमज: भेटवस्तूंवर कोणताही कर लागत नाही, त्यामुळे त्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवण्याची आवश्यकता नसते.
सत्य: फक्त विशिष्ट नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूच करमुक्त असतात. काही भेटवस्तू करपात्र असतात आणि त्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवाव्या लागतात.
गैरसमज: एकदा का तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास सुरुवात केली की तो तुम्हाला दरवर्षी भरावा लागतो.
सत्य: जर तुमचं वार्षिक उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला इतर कोणत्याही अटी लागू होत नसतील, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही.
करदात्यांना पॅन कार्डबद्दल हे माहिती असलं पाहिजे
- पॅन कार्ड फक्त इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठीच आवश्यक नसतं. ते तुमचं ओळखपत्रदेखील असतं. बँकेत खातं उघडण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी आणि मोठी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असतं.
- तुमच्याकडे पॅन कार्ड आहे म्हणून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं बंधनकारक नसतं. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं आवश्यक आहे की नाही हे तुमच्या उत्पन्नावर निश्चित केलं जातं.
- पॅन कार्डमधील पत्ता बदलणं कठीण नाही. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येतं.
- असाही एक गैरसमज असतो की जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता नसते. मात्र ही दोन्ही वेगवेगळी कागदपत्रं आहेत. काही आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक असतं. इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक असतं.
- मुलांकडे पॅन कार्ड असावं की नसावं? तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर एखाद्या गुंतवणुकीमध्ये मूल नॉमिनी असेल आणि एखादी मोठा आर्थिक व्यवहार त्या मुलाच्या नावानं करायचा असेल तर पॅन कार्ड आवश्यक असतं.
- याशिवाय, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणं बेकायदेशीर आहे आणि त्यावर दंडदेखील लावला जाऊ शकतो.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.