नेवासा – रामराज्याभिषेकाच्या प्रसंगी समर्थ वाल्मिकी ऋषींनी सांगितलेल्या ‘हनुमान चरित्रा’तील भक्ती आणि शक्ती या दोन्ही तत्त्वांचे दर्शन घडवणारी कथा नेवासा येथील ऐतिहासिक व पुरातन ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात सुरू झाली. कथाकार हनुमान कथा कार अंकुश महाराज जगताप यांनी पहिल्याच दिवशी आपल्या मधुर वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
बजरंगबली हनुमंत राय हे शिवशंकराचेच अवतार असून, त्यांच्या अवताराचे कारण व पुराणांतील विविध संदर्भ महाराजांनी रसाळ भाषेत सांगितले. कथा, भजन, गीते आणि भावस्पर्शी संगीत यांच्या संगमामुळे परिसरात भक्तिरस ओतप्रोत भरून वाहू लागला.
पहिल्या दिवशीच्या कथेत अंजनीसुताचा जन्म, भगवान श्रीरामाशी झालेली पहिली भेट, तसेच सुग्रीव–राम मैत्री घडविण्याचा प्रसंग छोट्या नाटुकलीच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या सादरीकरणात रामाच्या भूमिकेत निरंजन डहाळे, लक्ष्मणाच्या भूमिकेत देवेंद्र वर्मा, सुग्रीवाच्या भूमिकेत अक्षय टेकाळे, तर हनुमंताच्या प्रभावी भूमिकेत दिलीप महाराज खळदकर हे दिसले. कथेच्या शेवटी रामनामाच्या भजनाने भक्तीरस शिखरावर पोहोचला.

कथेच्या प्रारंभी वाल्मिकी रामायण व हनुमान चरित्र ग्रंथांची मिरवणूक काढण्यात आली. राजाभाऊ कडू यांनी ग्रंथ डोक्यावर घेतले होते. संत पूजनाचा मान दिगंबर पवार यांना लाभला, तर अन्नदानाचा मान ज्ञानेश्वर माऊली यांना मिळाला.
समारोपावेळी पसायदान प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मनोजभाऊ पारखे यांनी कथाकार अंकुश महाराज जगताप आणि त्यांचे वाद्य कलाकार यांचे विशेष आभार मानले. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने मंदिर परिसर दुमदुमून गेला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

