नेवासा | नाना पवार– नेवासा तालुक्यात वाळू तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाकडून नुकतीच कारवाई करण्यात आली. नागापूर फाट्यावर तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी दोन डंपर पकडले असले, तरी हा प्रकार म्हणजे “हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे” असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. वाळू तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या प्रवरा नदीपात्रातील अवैध उपशाकडे दुर्लक्ष होत असल्याने, ही कारवाई म्हणजे “जखम मांडीला आणि मलम शेंडीला” अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
वाळू तस्करीचा मूळ उगम प्रवरा नदीपात्रातील अवैध उत्खननात आहे. जोपर्यंत तिथे उपसा थांबत नाही, तोपर्यंत रस्त्यावरील किरकोळ कारवायांनी फरक पडणार नाही. नागापूर फाट्यावरील कारवाई कौतुकास्पद असली तरी ती केवळ औपचारिकता ठरू नये. नदीपात्रात शेकडो मजूर आणि यंत्रांच्या साह्याने अवाढव्य उपसा सुरू असताना, तिथे प्रत्यक्ष कारवाई करण्याचे धाडस महसूल प्रशासन का दाखवत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रवरा नदीपात्रात परप्रांतीय शेकडो मजुरांचा भरणा असून ‘चप्पू’च्या साह्याने दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे. मजुरांची जत्रा आणि वाहनांची वर्दळ स्पष्ट दिसत असतानाही प्रशासन तिथे पोहोचत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नदीपात्रात कारवाई करणे म्हणजे मोठ्या ‘अर्थपूर्ण हितसंबंधांना’ धक्का लावणे ठरेल, म्हणूनच प्रशासनाने हा जोखमीचा मार्ग टाळून केवळ रस्त्यावर वाहने पकडण्याचा सुरक्षित मार्ग निवडला आहे का? अशी शंका जनमानसात व्यक्त होत आहे.
पोलीस आणि महसूलमध्ये समन्वयाचा अभाव?
महसूलच्या कारवाईचा गाजावाजा होत असताना, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ही वाहने राजरोसपणे जातातच कशी, हा मोठा प्रश्न आहे. पोलीस आणि महसूल यांच्यात समन्वयाचा अभाव आहे की हे जाणीवपूर्वक केलेले अर्थपूर्ण ‘दुर्लक्ष’ आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळू तस्करीच्या मूळ केंद्रावर म्हणजेच प्रवरा नदीपात्रात पोलीस व महसूल विभागाकडून ठोस आणि निर्णायक कारवाई कधी होणार, याकडे आता सर्व नेवासकरांचे लक्ष लागले आहे.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

