उपनगराध्यक्षा, नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेवासा : नगरपंचायत कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कामकाज विस्कळीत झाले असून, नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. नगरपंचायतीसाठी पूर्ण वेळ पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नेमण्याची मागणी निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात प्रमुख तांत्रिक अधिकारी नसल्याने नियोजनाचा अभाव निर्माण झाला आहे.
परिणामी, देखभाल-दुरुस्ती, नव्या कामांचे प्रस्ताव रखडले असून,तांत्रिक निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने पाणीपुरवठ्याच्या कामकाजावर परिणाम होतो.
नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही विभागात पूर्ण वेळ अभियंता उपलब्ध नाही. तांत्रिक निर्णय घेण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याने पाणीपुरवठ्याच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्ण वेळ अभियंत्याची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत शहरातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी उपाय शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. निवेदनावर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान, नगरसेवक गटनेते जितेंद्र कुन्हे, नगरसेवक संभाजी धोत्रे, नगरसेवक स्वप्निल मापारी, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र काळे, नगरसेविका जयश्री चंद्रकांत शिंदे, नगरसेविका शहिदाबी पठाण, नगरसेविका सोनल चव्हाण, नगरसेविका नसरीन शेख, नगरसेविका शोभा व्यवहारे, नगरसेविका प्रतिभा गवळी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नावर दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी पूर्ण वेळ अभियंत्याची नियुक्ती कधी करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

