नेवासा – विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पुण्यनगरीत सध्या नगरपंचायतीतील राजकीय व प्रशासकीय वादामुळे अस्वस्थता पसरली आहे. सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष तीव्र झालेला असतानाच, कार्यालय अधीक्षकांनी शासकीय कार्यालयात चक्क ‘खासगी बाउन्सर’ तैनात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे प्रशासकीय शिस्तीचे धिंडवडे निघाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नगरपंचायतीत सध्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्यातील मतभेदांमुळे कामकाज विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत कार्यालय अधीक्षक सागर झावरे यांनी स्वतःच्या दालनाबाहेर बाउन्सरचा पहारा उभा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. शासकीय कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना या धिप्पाड बाउन्सरच्या गराड्यातून जावे लागत आहे.त्यांचा कार्यालयात वावर असल्याने, “हे नगरपंचायत कार्यालय आहे की एखाद्याची खासगी मालमत्ता?” असा सवाल नेवासाकर विचारत आहेत. या प्रकारामुळे नगरपंचायतीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.लोकप्रतिनिधींचेअंतर्गत वाद आणि प्रशासकीय मुजोरी यामुळे सामान्य नागरिक मात्र अडचणीत सापडला आहे. घरपट्टी, पाणी आणि रस्ते यांसारख्या मूलभूत कामांसाठी येणाऱ्या जनतेला या ‘बाऊन्सरशाही’चा सामना करावा लागत आहे. लोकशाहीत जनतेचा सेवक असलेल्या अधिकाऱ्याने अशी दहशत निर्माण करणे अत्यंत चिंताजनक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

‘आमच्या संरक्षणाची जबाबदारी पत्रकारांनी घ्यावी?’कार्यालयात खासगी बाउन्सर तैनात करण्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, कार्यालय अधीक्षक सागर झावरे यांनी, “गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे हे बाउन्सर ठेवले आहेत,” असे अजब समर्थन केले. यावर “सरकारी अधिकाऱ्याला असा अधिकार आहे का? पोलीस संरक्षण का घेतले नाही?” असा कायदेशीर प्रश्न विचारताच, “मग आमच्या संरक्षणाची जबाबदारी पत्रकारांनी घ्यावी ?” असे उद्धट उत्तर झावरे यांनी दिले. पत्रकारांनी नाराजी व्यक्त करताच, “ते माझे मित्र आहेत,” अशी भूमिका घेत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
– मुख्याधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष!नगरपंचायतीत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासकीय कार्यालयात खासगी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्याचा प्रकार नियमबाह्य आहे का, याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरातून केली जात आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

