
सोनई – श्री शनैश्वर देवस्थान व्यवस्थापनास वारंवार पत्रव्यवहार करूनही कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तसेच सध्याच्या अडचणी सोडवण्यास उशीर केल्याबद्दल कामगार युनियनच्या वतीने २ मार्चपासून साखळी उपोषणाचा इशारा श्री शनैश्वर देवस्थानला दिला आहे.
डिसेंबर २०२५ पासूनचा पगार, दिवाळी बोनस यासह वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जात असल्यामुळे व्याजाचा वाढीव भुर्दंड कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

कामगार युनियनने यापूर्वी अनेकदा पत्रव्यवहार केलेला आहे. त्याबाबत २० ऑक्टोबर २५ रोजी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी कामगार युनियन संघटनेस पत्र देऊन काही दिवसात सर्व प्रश्न मार्गी लावू अशा आशयाचे पत्र दिले होते परंतु अद्यापपर्यंत त्यावर काहीच निर्णय घेतलेला दिसत नसल्याने व कर्मचाऱ्यांबाबतची उदासीनता दिसून येत असल्याने बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

दिवाळीचा बोनस म्हणून दरवर्षी पगाराच्या दीडपट रक्कम मिळत असते. मागील विश्वस्त मंडळ तसेच शासन नियुक्त कार्यकारी समिती यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अद्यापपर्यंत दिपावली बोनस कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.सहाय्यक कामगार आयुक्त अहिल्यानगर यांचे समोर कर्मचारी युनियन व विश्वस्त मंडळ यांच्यामध्ये झालेल्या समझोत्यानुसार वेतन बदलातील फरक कर्मचाऱ्यांना थकीत वेतनासोबत अदा करण्यात यांवा.सप्टेंबर २०२५ पासून वेतनासोबत पीएफ, एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे.

कर्मचाऱ्यांचे डिसेंबर २५ व जानेवारी २६ चे मासिक वेतन राहिलेल्या दीपावली बोनस सोबत एकत्रित अदा करावा तसेच पुढील वेतन महिन्याच्या ७ तारखेपर्यंत अदा करावे. दि २९ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रानुसार कर्मचाऱ्यांचा जादा कामाचा मेहनताना देण्यात आला नसून तो अदा करण्यात यावा. आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सोमवार २ मार्च पासून भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कामकाज चालू ठेवून पाच सदस्य कर्मचारी बेमुदत उपोषण करणार आहेत. इतर कर्मचारी कामकाज वेळ सोडून इतर वेळेस साखळी उपोषणात सहभागी होतील असे कामगार युनियनचे अध्यक्ष श्यामसुंदर शिंदे यांनी सांगितले.
निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहायक धर्मदाय आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

