
खेडले परमानंद – नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडले परमानंद व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.

उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या अद्वितीय कार्याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी शिवस्तुती, पोवाडे व प्रेरणादायी भाषणांद्वारे वातावरण शिवमय केले.
यानंतर महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवराय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेले. भगव्या पताकांनी सजलेली मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गावातून मार्गक्रमण करत होती. लयबद्ध लेझीम पथक हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. त्यांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली.

मिरवणूक खेडले परमानंद गावातून ग्रामपंचायत परिसरात पोहोचली. विशेष म्हणजे शिवजन्माची तिथी खेडले परमानंद येथे लिहिलेल्या ‘शिवभारत’ ग्रंथातून जगासमोर मांडणारे शिवभारताचे लेखक कवी परमानंद यांच्या समाधीस्थळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याच ऐतिहासिक भूमीत ‘शिवभारत’ ग्रंथाचे लेखन झाले असल्याने या स्थळाला विशेष सांस्कृतिक ,धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक स्थळाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल. उपस्थितांनी समाधीस्थळास अभिवादन करून शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, महिला भगिनी तसेच दोन्ही शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान करून उत्सवाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त सहभागामुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे जन्मोत्सव सोहळा यशस्वीपणे पार पडला. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने गावात ऐतिहासिक अभिमान, एकजूट आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून देणारा हा सोहळा खेडले परमानंद गावासाठी प्रेरणादायी ठरला. सर्वात शेवटी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

