बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श शिक्षक भाऊसाहेब कचरू सावंत हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे मोठ्या भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुळा एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त माजी सरपंच बाजीराव पाटील मुंगसे होते. या सोहळ्याला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मठाधिपती देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी सभापती काशिनाथ नवले, रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे, हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे, हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप प्रदीप महाराज वाघमोडे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.

यावेळी सरपंच चंद्रकांत मुंगसे, आरोळे सर, अश्विनी कदम मॅडम, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे, राज्य तलाठी महासंघाचे उपाध्यक्ष सावंत मेजर, हभप रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे, माजी आमदार पांडुरंग अभंग, जिल्हा शिक्षक नेते बापूसाहेब तांबे,शिक्षक बॅंकेचे चेअरमन गोरक्षनाथ विटनोर, शिक्षक बॅंकेचे माजी चेअरमन रामेश्वर चोपडे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सरांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी हभप देविदास महाराज म्हस्के बोलताना म्हणाले की, शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला पैलू पाडणारा शिल्पकार असतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब सावंत सर या पुढील काळात ज्ञानेश्वरीची सेवा करावी, जीवन आनंदात जाईल, असे गौरवोदगार काढले. यावेळी भाऊसाहेब सावंत सर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, माझे विद्यार्थी आज मोठमोठ्या क्षेत्रात चमकत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. मुलांमध्येच भगवंत समजत विद्यार्थी घडवले. बाहेरील विद्यार्थी घडवत असताना घरच्यांनाही कमी वेळ मिळाला तर घरच्यांची दिलगिरी व्यक्त करत भावनिक वक्तव्य केले.

निवृत्ती फक्त सेवा पुस्तकातच असते. परंतु समाजकार्य आणि विद्यार्थ्यांच्या हृदयातून शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. माझे पहिलीपासून तर पूर्ण शिक्षण मामाने केले व माझं पूर्ण बालपण मामाच्या गावीच गेले म्हणजे देडगाव येथे गेले. म्हणून मी मामाचा आयुष्यभर ऋणी असेल. मान्यवरांचे आभार व्यक्त करत मी कायम आपला ऋणी राहील, अशी भावना भाऊसाहेब सावंत सर यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी माजी सभापती सुनीताताई गडाख, विष्णू बाळासाहेब मुरकुटे यांनी भाऊसाहेब सावंत सर यांचा सपत्नीक सन्मान करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यानिमित्त ढोल-ताशांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात सावंत सर व त्यांच्या सहचारिणी यांचे स्वागत करण्यात आले. सरांनी घडवलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

आपल्या लाडक्या गुरूंना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातून हजेरी लावली होती. जेऊर हैबती येथील सावंत सर यांचे माजी विद्यार्थी सुभाष औटी यांनी या कार्यक्रमाचा पूर्ण मंडप, साउंड सिस्टिम, व्यासपीठ दिले. यावेळी माजी विद्यार्थी संघाच्या वतीने सरांना मानपत्र, सन्मानचिन्ह आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सावंत सर यांच्यावतीने मातृ पूजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सतीशकुमार भोसले यांनी केले. माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देडगाव, माजी विद्यार्थी संघ देडगाव, शाळा व्यवस्थापन समिती केंद्र शाळा देडगाव, विविध कार्यकारी सेवा सोसायटी देडगाव, ग्रामपंचायत देडगाव, बालाजी देवस्थान ट्रस्ट, अहिल्याबाई होळकर विद्यालय देडगाव, सर्व माजी विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

