नेवासा : तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानने शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी सुरु केलेले ५०० रुपये दर्शन शुल्क बंद करावे, अशी मागणी कांगोणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी देवस्थानचे प्रशासक डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे. त्वरित निर्णय न घेतल्यास २६ जानेवारीपासून प्रशासकीय कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

शनिशिंगणापूर देवस्थानचे प्रशासक डॉ. गेडाम यांना दिलेल्या निवेदनात रावडे म्हणाले, शनिशिंगणापूर देवस्थान येथे देश-विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना काही सूचना, निवेदने द्यावयाची असल्यास, काही समस्या बाबत बोलायचे असल्यास देवस्थानला मोठी आर्थिक मदत दयावयाची असल्यास त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निराकरण करणेकरिता प्रशासकीय कार्यालयात देवस्थानचा जबाबदार अधिकारी कायम उपस्थित असणे आवश्यक आहे.

त्यामुळे शिंगणापुर मुख्यालयी वास्तव्यास राहिल आणि प्रशासकीय कार्यालयात कायम उपस्थित असेल अशा जबाबदार व सक्षम अधिकाऱ्याची देवस्थानने तातडीने नेमणूक करावी. तसेच शनिचौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी प्रति भाविक ५०० रुपयांप्रमाणे पैसे घेउन दर्शनासाठी चौथऱ्यावर जाऊ दिले जाते. ५०० रुपये न देणाऱ्या भाविकाला चौथऱ्यावर जाण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे ५०० रूपये प्रतिभाविक पैसे घेऊन शनि शिंगणापूर देवस्थानचे प्रशासनाकडून भाविकांची लूटमार होत आहे.

दर्शनासाठी पैसे घेण्याची ही पद्धत भेदभाव करणारी व अन्यायकारक असल्याने ती बंद करण्यात यावी. भाविकांच्या मागणीची गंभीरपणे दखल घेउन योग्य कार्यवाही करण्यात यावी अन्यथा दि. २६ जानेवारी २०२६ पासून शनिशिंगणापुर देवस्थान प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा रावडे यांनी निवेदनात दिला.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

