
सोनई – येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२५-२६ गळीत हंगामात अवघ्या १०८ दिवसात ९ लाख ३ हजार ६६० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. नियोजनबद्ध कार्यपद्धती, तांत्रिक सुधारणा आणि शेतकरी -कामगारांच्या सहकार्यामुळे कारखान्याने नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करत कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

दिवसाला सरासरी ८ हजार ३६७ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. हंगामाच्या सुरुवातीला पावसामुळे रान ओले असल्याने ऊस तोडणी आणि वाहतूक व्यवस्थापनात अडचणी निर्माण झाल्या. तसेच शेवटच्या टप्प्यात उसाची उपलब्धता कमी होत आल्याने काही दिवस कारखाना कमी क्षमतेने चालवावा लागला. तरीही एकूण गाळपात लक्षणीय वाढ साधण्यात व्यवस्थापनाला यश आले. मागील हंगामाच्या तुलनेत मोठी झेप कारखान्याने घेतली आहे.

मागील २०२४-२५ च्या हंगामात कार्यक्षेत्रात उसाचे प्रमाण घटल्याने गळीत हंगाम केवळ ८८ दिवसात आटोपला. त्यावेळी ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. त्यातून ५ लाख ४३ हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली. तसेच एक कोटी लिटर इथेनॉल निर्मिती आणि वीज प्रकल्पातून ४ कोटी ५१ लाख ७४ हजार युनिट वीजनिर्मिती करण्यात आली.
यंदा मात्र सूक्ष्म नियोजन, ऊस नोंदणी, वेळेवर तोडणी वाहतूक नियोजन, तांत्रिक सुधारणा आणि देयकांची तत्पर पूर्तता यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ साधता आली. संस्थापक माजी खा. यशवंतराव गडाख पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजीमंत्री शंकरराव गडाख यांच्या सूचनेनुसार व्यवस्थापनाने काटेकोर नियोजनावर भर दिला. यंदाच्या हंगामात अंदाजे १ कोटी २५ लाख लिटर इथेनॉल निर्मिती होईल, असा विश्वास कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ कारखान्याच्या आर्थिक स्थैर्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगाला पर्यायी उत्पन्नाचा मजबूत स्त्रोत उपलब्ध होत असून, ऊस उत्पादकांना स्थिर बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे. गळीत हंगामाची सांगता बुधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी मुळा उद्योग समूहाचे संस्थापक माजी खा. यशवंतराव गडाख पाटील राहणार असून तसेच माजीमंत्री, शंकरराव गडाख यांच्या हस्ते सांगता समारंभ पार पडणार आहे.

यावेळी चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाइस चेअरमन कडूबाळ कर्डिले तसेच कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर उपस्थित राहणार आहेत. सभासद, ऊस उत्पादक, तोडणी कामगार आणि पुरवठादार यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्यवस्थापनाने केले. नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचा टप्पा गाठल्याने शेतकरी, कामगार व सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वाढलेले गाळप, इथेनॉल निर्मितीतील वाढ आणि स्थिर व्यवस्थापन यामुळे कारखान्याने यंदा प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

