
भेंडा – ग्रामसभेत ‘जातमुक्त गाव’ ठराव एकमताने मंजूर करून सौंदाळा गावाने सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जातीय भिंतींना धडक देत घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गावाला भेट देत ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा सन्मान केला. या प्रसंगी माजी आमदार मोहनराव जोशी, सचिन भाऊ गुजर, जिल्हा महिला अध्यक्षा लताताई डांगे, बाबासाहेब दिघे, प्रभावती ताई घोगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कॉ. बाबा आरगडे व दिनकर गर्जे यांचीही उपस्थिती होती.

मनोगत व्यक्त करताना श्रद्धा आरगडे, प्रभावती ताई घोगरे, बाबासाहेब बोधक, सचिन भाऊ गुजर, लताताई डांगे तसेच सरपंच शरद आरगडे यांनी गावाच्या एकजुटीचा अभिमान व्यक्त केला. आपल्या ज्वलंत भाषणात हर्षवर्धन सपकाळ यांनी मानवाच्या उत्क्रांतीचा दाखला देत स्पष्ट शब्दांत सांगितले, “माणूस हा आधी मानव आहे; जात आणि धर्म या दुय्यम ओळखी आहेत.” स्वतःच्या मुलीच्या शाळेच्या नोंदणीवेळी ‘जात मानव, धर्म मानवता’ अशी नोंद करण्याचा आग्रह केल्याचे सांगत त्यांनी सामाजिक समतेचा ठाम संदेश दिला.

“काही गावात जावंसं वाटत नाही, तर काही गावातून निघावंसं वाटत नाही; सौदाळा हे दुसऱ्या प्रकारचं गाव आहे,” असे गौरवोद्गार काढत त्यांनी या ठरावाला ‘धाडस, दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श म्हटले. “आताची वेळ ‘करेंगे या मरेंगे’ची आहे; केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे,” असा लढाऊ संदेश देत त्यांनी समाजाला कृतीची हाक दिली.
“गढूळ पाण्यात तुरटी फिरवून ते स्वच्छ करण्याचे काम सौदाळा ग्रामसभेने केले आहे,” असे सांगत त्यांनी या निर्णयाला सामाजिक शुद्धीकरणाची प्रक्रिया असे संबोधले.

या ऐतिहासिक ठरावामुळे सौदाळा गाव राज्यभर चर्चेत आले असून, समता-बंधुता-मानवतेचा दीप प्रज्वलित करणारा हा निर्णय इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मानवतेची पताका फडकावणाऱ्या सौदाळा गावाने सामाजिक क्रांतीकडे टाकलेले हे ठाम पाऊल म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी बाळासाहेब आरगडे यांनी केले, तर प्रास्ताविक गणेश आरगडे यांनी केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

