
सोनई – श्री शनैश्वर देवस्थान, शिंगणापूर, जिल्हा अहिल्यानगर हे राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध व ऐतिहासिक देवस्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे श्रध्देने दर्शनासाठी येत असतात. भाविकांच्या धार्मिक श्रद्धा, भावभावना आणि जनहिताच्या दृष्टीने या देवस्थानचे प्रशासन सुयोग्य, पारदर्शक, सुसूत्र व उत्तरदायित्वपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमान्वये, शिंगणापूर, जिल्हा अहिल्यानगर येथील ” श्री शनैश्वर देवस्थान” या नावाने नोंदणी झालेली सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था पुनर्घटित करणे, तसेच शिंगणापूर येथील श्री शनैश्वर मंदिर या देवस्थानचे सुयोग्य, पारदर्शक व उत्तरदायित्वपूर्ण प्रशासन सुनिश्चित करणे आणि त्या विश्वस्तव्यवस्थेवर राज्य शासनामार्फत आवश्यक नियंत्रण ठेवणे, तसेच त्यास अनुषंगिक व संबंधित बाबींसाठी तरतूद करण्याच्या उद्देशाने, श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ हा अधिनियम दिनांक १३ ऑगस्ट, २०१८ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
सदर अधिनियम दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ पासून अंमलात आलेला आहे. उक्त अधिनियमातील कलम ५ च्या उपकलम (१) अन्वये, देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचे व्यवस्थापन करण्याच्या प्रयोजनार्थ, शासनाकडून “श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती” या नावाने संबोधली जाणारी एक समिती स्थापन करण्याची तरतूद आहे.

श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना, देवस्थानच्या प्रशासनात विविध प्रकारच्या अनियमितता, बनावट अॅप्स संदर्भातील घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, देवस्थानातील हिंदू व मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली वैमनस्यपूर्ण परिस्थिती, श्री शनिदेवाचे चौथऱ्यावरुन वाद, यावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, तसेच देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत गंभीर घटना शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा गंभीर बाबींमुळे देवस्थानच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य भाविकांमध्ये अस्वस्थता व तीव्र रोष निर्माण होऊन, देवस्थानावरील त्यांचा विश्वास डळमळीत झालेला आहे. त्यामुळे, भाविकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी, देवस्थानच्या प्रशासनात सुसूत्रता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित शासन निर्णय क्रमांक: शादेवी-२२२०/पी.क्र.२९/सीए करण्याच्या दृष्टीने सदर अधिनियमाची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. त्यासाठी श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ दि.२२.०९.२०२५ रोजी पासून लागू करण्यात आला आहे.

सदर अधिनियम अंमलात आलेला असला तरी, अधिनियमातील कलम ५ च्या उपकलम (१) गठीत अन्वये स्थापन करण्यात येणारी “श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे. सदर समिती गठीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सदर समिती गठीत होईपर्यंत देवस्थानचा कारभार सुरळीत, शिस्तबद्ध व पारदर्शकपणे चालविणे, तसेच भाविकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने, देवस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी अंतरिम स्वरूपात प्रशासक नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय:-
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम, २०१८ मधील कलम ५ च्या उपकलम (१) अन्वये, “श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्तव्यवस्था व्यवस्थापन समिती” या नावाने संबोधली जाणारी समिती गठीत होईपर्यंत, सदर देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचा कारभार सुरळीत, सुसूत्र, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालविला जावा, तसेच देवस्थानच्या दैनंदिन व्यवहाराचे व्यवस्थापन विनाविघ्न पार पाडले जावे, याकरिता जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांची “प्रशासक” म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी सदर देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचे संपूर्ण प्रशासन, व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण, तसेच भक्तांसाठीच्या सर्व सेवा-सुविधा यांचे व्यवस्थापन जबाबदारीपूर्वक पार पाडावे.

ही नियुक्ती वर नमूद व्यवस्थापन समिती विधिपूर्वक गठीत होईपर्यंत किंवा शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत लागू राहील. व्यवस्थापन समिती गठीत झाल्यानंतर, या प्रशासकाची नियुक्ती आपोआप समाप्त होईल आणि त्यांनी देवस्थानचा कारभार तात्काळ समितीकडे सुपूर्द करणे आवश्यक राहील.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल शनिभक्त विशाल सुरपुरिया यांनी आनंद व्यक्त केला.
ते म्हणाले, “सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे भक्तांच्या विश्वासाचा विजय आहे. देवस्थानातील अन्यायाला आता न्याय मिळणार असून, पारदर्शकतेच्या दिशेने हा मोठा पाऊल आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

