नेवासा : नगरीचे ग्रामदैवत व भगवान विष्णूंचे स्त्रीरूप अवतार असलेल्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने वेदांताचार्य महंत देवीदास महाराज म्हस्के यांच्या प्रेरणेद्वारे संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी व ध्वज मिरवणूक दिंडीद्वारे काढण्यात आली. या दिंडीमुळे जणू माऊलीच श्री मोहिनीराजांच्या दर्शनाला आल्याची भावना वारकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.

येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरापासून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीचा प्रारंभ देवस्थानचे विश्वस्त देवीदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते माऊलींच्या पादुका पूजनाने व ध्वज पूजनाने करण्यात आला. ज्ञानोबा माऊली काराम, बोल मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ते नेवासा शहरातील ग्रामदैवत श्री मोहिनीराज मंदिर अशा निघालेल्या ध्वज पालखी दिंडी मिरवणुकीचे नेतृत्व वेदांताचार्य म्हस्के यांनी केले.दिंडीमध्ये गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत भगवान महाराज जंगले, रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात, भागवताचार्य अंकुश महाराज जगताप, गहिनीनाथ महाराज आढाव, हरिभाऊ महाराज म्हस्के, गणेश महाराज आरगडे, अंजाबापू कर्डिले, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे, कैलास जाधव,जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे सहभागी झाले होते.

पालखी ज्ञानेश्वर महाराज मंदिर, संत तुकाराम महाराज मंदिर, लोखंडे गल्ली, संत ज्ञानेश्वर महाराज चौक, डॉ. हेडगेवार चौक, मारुती चौक मार्गे श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात आली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात श्री मोहिनीराजांचा नामघोष करण्यात आला. पालखीतील माऊलींच्या पादुका श्री मोहिनीराजांच्या मंदिरात आणण्यात आला. पादुकांद्वारे माऊलींनीच मोहिनीराजांची भेट घेतल्याचा प्रसंग यावेळी अनुभवयास मिळाले.

देवीदास महाराज म्हस्के म्हणाले, तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराजांचा अवतार महिमा अगाध असा आहे त्यांच्या अवतार कायनि नेवासा भूमीत देवदेवतांचा पदस्पर्श झाला. भगवान विष्णूंनी सुंदर ललनेचे रूप धारण करून दानवांना अमृत वाटपाने मोहिनी घातली तर त्याच भगवान विष्णूंनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतारात येऊन संस्कृतमधील गीता मराठी भाषेत अनुवादित केली म्हणून भगवान विष्णूंची कृपादृष्टी या क्षेत्रावर असल्याचे सांगत त्यांनी आपण खरे भाग्यवान असल्याचे म्हटले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

