सोनई – सुलतानपुर (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथे कृषि महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार कार्यक्रमांतर्गत डाळींब ,पपई व ऊस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर दिनांक १ जुलै २०२५ रोजी सुलतानपुर येथील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र कृषी दिन व शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते त्याचबरोबर महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी संभाजी शहादेव खाटीक यांच्या डाळींब व पपई बागेत करण्यात आले. डाळींब व पपई तसेच ऊस पिकामध्ये येणाऱ्या रोग व किडींचे शास्त्रीय पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हे कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.

प्रा. डॉ. अतुल दरंदले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कृषी महाविद्यालय सोनई शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची त्यांमध्ये अत्याधुनिक माती पाणी तपासणी प्रयोगशाळा, जैविक खते निर्मिती, गांडूळ खत निर्मिती तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी घेत असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. प्रास्तविकेनंतर कृषी महाविद्यालय सोनई चे उपप्राचार्य प्रा.सुनील बोरुडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व शेतीकडे उद्योग म्हणून पाहावे व शेतमालाची विक्री कश्या पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले . याचबरोबर शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीची शाश्वतता टिकवावी असे आवाहन त्यांनी केले.त्यामध्ये त्यांनी काटेकोर रित्या शेती कशी करावी, शेतीचं पूर्ण पिकाची जिओमेट्री अभ्यास करून मगच शेती करावी , शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान कसे अवगत करावे, शेतीमध्ये पिकलेल्या मालाचे मार्केटिंग कसे करावे हे सांगितले.

कार्यक्रमात पीक संरक्षण विषय विशेषज्ञ प्रा. नरेंद्र दहातोंडे व प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांनी उपस्थित शेतकरी बंधूंना डाळिंब व पपई तसेच ऊस पिकावर येणाऱ्या विविध किडी व रोग यांची ओळख, कीटकनाशकांचा सुज्ञ वापर, कीड व रोग नियंत्रणाचे जैविक व रासायनिक उपाय, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर, विविध जैविक खते व जैविक बुरशीनाशके यांचा बागेमध्ये प्रभावी वापर या विषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषिदूत वरूण गारुळे ,निखिल दिघे ,आदित्य लोंढेपाटील, ओंकार कामठे ,रुपेश कदम ,युवराज हाके यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य सुनील बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

सुलतानपुर गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी चर्चासत्रात मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध प्रश्न विचारून संवाद साधला. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.
हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनाचे प्रभावी व्यासपीठ ठरले असून, भविष्यातही अशाच चर्चासत्रांची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.