
नेवासा – लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर विविध प्रकारचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप प्रभाकरराव शिंदे यांनी केला आहे.

विरोधी उमेदवारांना धमकावणे, त्यांच्या उमेदवारी अर्जावरील सूचक व अनुमोदक यांच्यावर दबाव आणणे, त्यांना फरार करण्याचा प्रयत्न करणे तसेच कारखान्याच्या नोंदींवर खोटी माहिती तयार करून उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेणे, असे प्रकार करून काही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

शिंदे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. मात्र, कितीही दबाव टाकला तरी सभासदांच्या हक्कासाठी आणि कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व व्यथा समोर आणण्यासाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे.

“एक जरी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभा राहिला तरी निवडणूक होणारच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सभासदांचा आणि कर्मचाऱ्यांचा दबलेला आवाज या निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर येईल. कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांना प्रश्न विचारण्याचा आणि आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

“जर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असेल, तर सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीला घाबरण्याचे कारण काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सभासदांना लोकशाही पद्धतीने आपला कौल देण्याची संधी मिळाली पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया कोणत्याही दबावाशिवाय पार पडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखून सर्व उमेदवारांना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षाही प्रभाकरराव शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







