हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लावणारा निर्णय घेतला असून, एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ जाहीर केली आहे.
MSRTC Fare Hike : उन्हाळ्याची सुट्टी लागली की नोकरदारांना आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात ते गावाकडचे. गावी जाण्यासाठी आजही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांची पहिली पसंती असते ती सगळ्यांच्या हक्काच्या आणि लाडक्या ‘लाल परी’ला. पण यंदा मात्र गावाकडची ही वाट थोडी खडतर आणि खिशाला अधिक झळ पोहोचवणारी ठरणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सुट्ट्यांच्या हंगामात प्रवाशांच्या खिशाला थेट कात्री लावणारा निर्णय घेतला असून, एसटीच्या तिकीट दरात मोठी वाढ जाहीर केली आहे.

उन्हाळी हंगामातील वाढती गर्दी आणि उत्पन्न वाढीचा प्रयत्न लक्षात घेता, एसटी महामंडळाने तिकीट दरात तब्बल 10 टक्क्यांची वाढ केली आहे. येत्या 15 एप्रिल 2026 पासून ही नवी भाडेवाढ संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे. त्यामुळे सुट्टीत कुटुंबासोबत गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागतील. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 90 ते 100 रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार थेट प्रवाशांच्या खांद्यावर पडणार असल्याने, यंदाचा गावाकडचा प्रवास चांगलाच खर्चीक ठरणार आहे.
दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या की ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकांवर मोठी झुंबड उडते. एसटीचे जाळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, अगदी वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचले असल्याने आजही हजारो प्रवासी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित प्रवासाला पसंती देतात. महामंडळाच्या नियमावलीनुसार, गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरूपात तिकीट दर वाढवण्याचा अधिकार एसटी प्रशासनाला आहे. नेमक्या याच अधिकाराचा वापर करून ही ‘हंगामी भाडेवाढ’ लागू करण्यात आली आहे.

ही वाढ साधी बस, मिडी बस, एक्सप्रेस आणि रात्रसेवा या सर्व सेवांना लागू असेल.
नव्या दरानुसार, प्रौढांसाठी प्रति टप्पा 12 रुपये, तर लहान मुलांसाठी 7 रुपये आकारले जाणार आहेत.
काही प्रमुख मार्गांवरील नवीन दर पाहूया:
- परळ ते कोल्हापूर: 640 वरून 704 रुपये
- मुंबई ते कोल्हापूर: 750 वरून 825 रुपये
- मुंबई ते लातूर: 900 वरून जवळपास 1000 रुपये
- मुंबई ते रत्नागिरी: 600 वरून 700 रुपये
उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर महसूल वाढीसाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा आर्थिक ताण वाढवणारा ठरत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






