नेवासा – नेवासा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा वारंवार खंडित झाला. काही ठिकाणी तब्बल रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांत १२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा विस्कळीत राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत नगरसेवक स्वप्निल मापारी यांनी महावितरणकडे निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर आगामी मुसळधार पावसाळ्यात वीजपुरवठ्याच्या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शहरातील अनेक घरांमध्ये लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच रक्तदाबासारख्या आजारांनी त्रस्त व्यक्ती राहतात. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सर्वांकडे इन्व्हर्टरची सुविधा नसते आणि ज्या घरांमध्ये इन्व्हर्टर आहेत, त्यांचाही बॅकअप मर्यादित काळासाठीच उपलब्ध असतो. याशिवाय रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे चोरीसारख्या घटनांचा धोका वाढू शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली.
महावितरणाने शहरातील डीपी (रोहित्र), वीजवाहिन्या आणि वीजतारांच्या संपर्कात येणाऱ्या झाडांची तातडीने देखभाल करावी, जेणेकरून पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहील. तसेच कर्मचाऱ्यांनाही रात्री-अपरात्री जीव धोक्यात घालून दुरुस्तीची कामे करण्याची वेळ येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय वाढत्या वीजभाराचा विचार करून नेवासा शहरातील रोहित्रांची (डीपी) संख्या वाढवावी, अशी मागणीही नगरसेवक स्वप्निल मापारी यांनी केली आहे.
या मागण्यांचे निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता कानडे यांना देण्यात आले असून, आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







