नेवासा-न्यायालयाची इमारत उभी राहिल्यानंतर त्रुटी राहिल्याचे लक्षात येते. असे न होता इमारत उभी राहण्यापूर्वीच लक्ष देणे गरजेचे असून, त्यासाठी एक समिती नेमून लक्ष घातले पाहिजे. नेवासे न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचा दर्जा आणि गुणवत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही, अशा इशारा देत न्यायालयाची नवी इमारत ही २४ महिन्यांत पूर्ण करण्याचा कालावधी संबंधितांना दिलेला असला तरी या कालावधीच्या आतमध्ये सुद्धा हे काम पूर्ण केल्यास काहीही हरकत नसल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी केले.
नेवासे न्यायालयाच्या नवीन इमारत भूमिपूजन समारंभाप्रसंगी न्या. कंकणवाडी बोलत होत्या. याप्रसंगी न्यायमूर्ती रोहित जोशी, अहमदनगर जिल्हा व सत्र प्रभारी न्या. आशिष पाटील, नेवासे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्या. हरिभाऊ वाघमारे, मुंबई गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष राजेंद्र उमाप, अमोल सावंत, नेवासे तालुका वकील संघाचे अध्यक्ष अजय रिंधे, जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण घावटे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घले. माजी जिल्हा परिषद सदस्य विजया अंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती कंकणवाडी म्हणाल्या की, नेवासे ही संतांची पावनभूमी असून हा परिसर सुजलाम सुफलाम झालेला असताना येथील गुन्ह्यांचा आलेख मात्र वरचढ असल्याचा खेदही त्यांनी व्यक्त केला. वकील मंडळींना न्यायदानाच्या कामामध्ये सहभाग नोंदविताना स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन कामे करा. लोकअदालतीच्या माध्यमातून वादाचे निराकरण होऊन वेळ वाया जाणार नाही, यासाठी प्रभाविपणे काम करण्याचे आवाहन करत नगर जिल्ह्याचे कामही चांगले असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी न्यायमूर्ती रोहित जोशी, न्या. हरिभाऊ वाघमारे, राजेंद्र उमाप, अमोल सावंत, नेवासे तालुका वकील संघांचे अध्यक्ष अजय रिंधे, जिल्हा कोर्ट प्रॅक्टिशनर बार असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण घावटे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन न्या. डॉ. प्रणिता सुगावकर आणि विधिज्ञ अनिता मोटे यांनी केले. आभार जिल्हा न्या. वाघमारे यांनी मानले
याप्रसंगी विधिज्ञ चंद्रकांत कदम, सुदाम ठुबे, राजू इनामदार, संजय राऊत, अण्णासाहेब अंबाडे, जावेद इनामदार, अशोक करडक, संजय सुखधान, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे. मख्याधिकारी निखिल फराटे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, नगरसेवक प्रवीण सरोदे, असिफ पठाण, महेश लोखंडे, कृष्णा परदेशी, संदीप सरकाळे, राम केंदळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट-वकिलांच्या कामकाज बंदने पक्षकारांवर अन्याय
नगर जिल्ह्याच्या पालक न्यायमूर्ती असलेल्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी म्हणाल्या की, न्यायालय किंवा आवारात काही घटना घडल्यानंतर वकील मंडळी कामकाज बंद ठेवतात. त्यामुळे हा पक्षकारांवर अन्याय असून, त्यांचा या घटनेशी संबंध नसताना निष्कारण वेळ वाया जात असतो. वकील मंडळींनाही सन्मानाची वागणूक मिळणेही गरजेचे असल्याचे सांगून वेळ वाया न घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
चौकट-ज्येष्ठांनी आता नवीन वकिलांना संधी द्यावी
न्यायालयाचे कामकाज मराठीतून चालते, असे म्हटले जाते, मात्र उच्च न्यायालयात हे कामकाज इंग्रजीमधूनच चालते. वकिलांची इंग्रजी लंगडी असेल तर अडचणी वाढतात, त्रासही होतो. वकील मंडळींना नेमके काय सांगायचे आहे, हे सुद्धा लवकर समजत नसल्याचे वास्तवही न्यायमूर्ती कंकणवाडी यांनी मांडले. ज्येष्ठ वकील मंडळींनी आता नव्या वकील मंडळींना केसेस चालवायला द्याव्यात, जोपर्यंत ते केस चालवणार नाही, तोपर्यंत त्यांना अनुभव येणार नाही, अनुभव हा समृद्धीकडे घेऊन जाणारा असतो, असे सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

