नेवासा : विवाहाच्या पवित्र बंधनाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना नेवासा तालुक्यातील गोपालपुर येथे उघडकीस आली आहे. संशयी स्वभावातून पतीने आपल्या पत्नीला टणक हत्याराने अमानुष मारहाण करून तिचा खून केला. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी पाषाणहृदयी पतीला अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा आणि विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचा विवाह आरोपी संतोष संभाजी वडागळे (रा. गोपालपुर, ता. नेवासा) याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच संतोषचा रागीट आणि संशयी स्वभाव समोर आला. तो वारंवार किरकोळ कारणावरून पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत असे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपीने पत्नीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. त्यानंतर स्वतः चा गुन्हा लपवण्यासाठी बनाव रचत तिला संशयास्पद रित्या ग्रामीण रुग्णालय, नेवासा येथे दाखल केले. मात्र, महिलेच्या अंगावरील गंभीर जखमा पाहून डॉक्टरांचा संशय बळावला.

महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचे प्राथमिक दर्शनी दिसत होते. अहिल्यानगर येथील सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले की, महिलेचा मृत्यू टणक वस्तूने केलेल्या अमानुष मारहाणीमुळे झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाला आहे. या अहवालाने पतीचा बनाव उघड पाडला.
आपल्या बहिणीचा छळ करून तिचा खून केल्याची खात्री पटल्यानंतर, मयत महिलेचा भाऊ अजित उत्तम शिंदे (वय २७) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी संतोष वडागळे याला अटक केली आहे. आरोपीवर कलम १०३(१) व ८५ नुसार नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

