नेवासा – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच नेवासा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधून पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. गावोगावी बैठका, घरभेटी, कार्यकत्यांचे मेळावे आणि जनसंपर्क मोहिमा यामुळे तालुक्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आपण रिंगणात असल्याचा आभास निर्माण करत अनेकांनी मतदारांच्या भेटीगाठींना वेग दिला होता. मात्र निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने या धावपळीला अचानक ब्रेक लागला असून इच्छुक आता शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकासाचा कणा असलेली पंचायत समिती या दोन्ही संस्था गेल्या ८ वर्षांपासून लोकप्रतिनिधीविना आहेत. निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागातील अनेक विकासकामे ठप्प असून संपूर्ण कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हाती आहे. निवडणूक जवळ आली की इच्छुकांची दारे उघडतात, हे ओळखून मतदारांनीही गावांतील उत्सव, जयंती, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित करून इच्छुकांना समाजसेवेची संधी दिली. निवडणूक लढवण्याच्या ईर्षेपोटी अनेकांनी सढळ हाताने देणग्या दिल्या. मात्र निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने आर्थिक व शारीरिक गुंतवणूक केलेल्या इच्छुकांना चांगलाच धक्का बसला आहे.

आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने संभाव्य मतदारसंघ निश्चित झालेले नाहीत.नवीन आरक्षण जाहीर झाल्यास अनेकांची समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे सतत मतदारसंघात फिरणारे इच्छुक आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. निवडणूक तारीख जाहीर होईपर्यंत शांत राहायचे, अशी अनौपचारिक भूमिका अनेक भावी सदस्यांनी घेतली आहे.

स्थानिक पातळीवरील नाराजी, बदलती सामाजिक समीकरणे व आरक्षणाचा मुद्दा यांचा परिणाम निकालावर होणार आहे. एवढी धावपळ आणि खर्च करूनही शेवटी मतदारांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी इच्छुकांना पुन्हा दारोदार फिरावे लागणार आहे. निवडणुका केव्हा होणार आणि इच्छुक मैदानात कधी उतरणार, असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

