नेवासाफाटा (वार्ताहर): गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा अंतर्गत करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर निवड, स्पर्धा परीक्षा व यशस्वी आयुष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उपजिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घ्यावेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे त्यांनी निरसन केले व त्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळण्यासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढ म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असते. योग्य दिशा, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा योग्य वापर करून ज्ञान वाढवावे व आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत सर्व सेवा संघ पाचेगाव संस्थेचे माजी अध्यक्ष श्री कल्हापुरे सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका वैष्णवी गांगुर्डे यांनी केले. प्रास्ताविक छात्राध्यापिका निकिता खाटीक यांनी केले. अध्यक्षीय सूचना छात्राध्यापिका पठाण मॅडम यांनी मांडल्या. अनुमोदन आव्हाड सर यांनी दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय छात्राध्यापक सतीश कर्डिले यांनी करून दिला. छात्राध्यापक नितिन जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार छात्राध्यापक कानडे सर यांनी मानले. यावेळी छात्राध्यापकांमध्ये शुभदा कोकणे, निकिता बोसले, माधुरी गायकवाड, ऋतुजा मॅडम, सायली मॅडम, सीमा गायकवाड, वाबळे सर आणि दिपाली मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संजय राजगुरू, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संत ज्ञानेश्वर बी.एड.कॉलेज मधील छात्र अध्यापकांनी प्राचार्या श्रीमती स्वाती वाचे व प्रा.श्रीमती मनिषा भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या केले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

